अध्यक्षपदाची लॉटरी कोणाला ?
By Admin | Updated: September 21, 2014 00:26 IST2014-09-21T00:26:22+5:302014-09-21T00:26:22+5:30
जिल्हा परिषद : आज निवडणूक, राणेंची भूमिका महत्त्वाची

अध्यक्षपदाची लॉटरी कोणाला ?
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा अडीच वर्षांचा काळ पूर्ण होत असल्याने उद्या, रविवारी निवडणूक होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाची लॉटरी कोणाला लागणार याकडे सर्वांची नजर लागली आहे. कुडाळ किंवा कणकवली मतदारसंघातील सदस्याची अध्यक्षपदी नेमणूक होणार असल्याने यामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत आणि जिल्हा परिषदेचे सदस्य संग्राम प्रभूगावकर यांची नावे आघाडीवर आहेत. आता नारायण राणे कोणाची शिफारस करतात हे उद्याच स्पष्ट होईल. आगामी विधानसभा निवडणुकीतील मतांच्या गणितांचा प्रभाव उद्याच्या निवडीवर दिसण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेवर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. यामध्ये अंतिम निर्णय काँग्रेसचे नेते नारायण राणे घेणार आहेत. तसेच युवा नेते नीतेश राणे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यावेळचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आहे. यामुळे अनेक दिग्गजांची नावे चर्चेत आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही प्रक्रिया होणार आहे. साहजिकच विधानसभेतील काँग्रेसला पडणाऱ्या मतांच्या गणितांचा विचार या निवडीत होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास जागा वाटपात काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या कणकवली आणि कुडाळ मतदारसंघात झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. तसेच विषय समिती सभापतीपदासाठीची निवडणूक २ आॅक्टोबरला जाहीर झाली आहे. त्यामुळे अध्यक्षपद ज्या तालुक्यात दिले जाईल. त्या खालोखाल इतर पदे विभागून देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे २ आॅक्टोबरला होणाऱ्या विषय समिती सभापतीपदांचा विचार करून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद दिले जाणार आहे. विषय समिती सभापतीपदाची गणितेदेखील आता मांडली जावू लागली आहेत. (प्रतिनिधी) सावंत, प्रभूगावकर आघाडीवर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे. कारण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सतीश सावंत हे जुने, जाणते आणि प्रशासनाची जाण असलेले पदाधिकारी आहेत. तर दुसरीकडे संग्राम प्रभूगावकर यांच्या नावाचीदेखील चर्चा होताना दिसत आहे.