सावंतवाडी : गेली अनेक वर्षे सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची इमारत होणार म्हणून स्वप्न दाखवण्यात येत आहेत. मात्र अद्याप रेल्वे टर्मिनस पूर्ण झाले नाही. सावंतवाडी रेल्वे टर्मिनस ला वाली कोण? अशा अशायचा फलक सध्या सावंतवाडी शहरात ठिकठिकाणी लावण्यात आला आहे. हा फलक कोणी लावला या बाबत अद्याप माहिती नसली तरी या निमित्ताने सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा विषय चांगलाच चर्चेला आला आहे.गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मोठ्याप्रमाणात चाकरमानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. यातील बहुतांश चाकरमानी हे रेल्वेने येतात. अनेक चाकरमान्यांना रेल्वेचे तिकिट बूकिंग करून ही अवघ्या काही सेकंदात आरक्षण फुल्ल दाखवण्यात येते. त्यामुळे अनेक चाकरमान्यांना कोकणात येणाऱ्या रेल्वेत उभे राहून येणे भाग पडते. तसेच कोकणात येणाऱ्या रेल्वे गाड्या ही हातावर बोटावर मोजण्या इतक्याच आहेत.सावंतवाडीत टर्मिनस होणार म्हणून गेली अनेक वर्षे भिजत घोंगडे आहे. दोन ते तीन रेल्वे मंत्री झाले त्यांनी सावंतवाडीत रेल्वे टर्मिनस करण्याचे आश्वासन दिले. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तर प्रत्यक्षात रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन केले. पण सध्या या टर्मिनसचे काम अर्धवट स्थितीत आहे. यातच आता फलकबाजीतून राग व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी ही अनेक वेळा असाच फलक लावण्यात आला होता.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला वाली कोण?, फलक बनला चर्चेचा विषय
By अनंत खं.जाधव | Updated: September 19, 2023 18:11 IST