२0१९ मध्ये कोणती क्रांती?
By Admin | Updated: October 8, 2014 00:14 IST2014-10-07T21:58:55+5:302014-10-08T00:14:28+5:30
नीतेश राणे : वैभववाडीतील प्रचारसभेत जठार, सावंतांवर टीका

२0१९ मध्ये कोणती क्रांती?
वैभववाडी : काँग्रेस नेते नारायण राणे यांनी २५ वर्षात जनतेशी विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. त्यामुळे येथील जनता त्यांच्या पाठीशी आहे. दर पाच वर्षांनी निवडणुकीपूर्वी नवीन क्रांती उदयास येते. २००९ मध्ये दूधक्रांती, २०१४ मध्ये हरितक्रांती झाली. २०१९ मध्ये कोणती क्रांती येतेय कोणास ठाऊक? अशा शब्दात जठारांची डेअरी व सावंतांच्या कारखान्याची टर उडवत नीतेश राणे यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली.
वैभववाडी येथे आयोजित प्रचारसभेत नीतेश राणे बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, प्रमोद जठारांचे प्रगतीपुस्तक हीच आमच्या प्रचाराची खरी ताकद आहे. पुस्तकात छापलेली सगळी कामे त्यांनी केली असतील तर प्रतिस्पर्धी उमेदवारांचे डिपॉझिट घालविण्याएवढा आत्मविश्वास जठारांमध्ये असायला हवा होता. मग ३४ हजारच का? त्यांच्या मागच्या जाहीरनाम्यातील कुठे दिसतोय बस डेपो, कुठे आहे हॉस्पिटल, शौचालय तरी बाजारपेठेत दिसतेय का? असा सवाल करीत पाच वर्षात तुम्हाला आमदार कितीवेळा गावात दिसला? याचे आत्मपरीक्षण करून तुम्हीच निर्णय घ्या, असे आवाहन केले.
रक्ताचे पाणी करून वाढवलेली वृत्तपत्रे विकली गेली आहेत. पत्रकारितेचा धंदा केला आहे. पॅकेज संपले की बातमी बंद ही संघाची पत्रकारिता आहे. ही पॅकेज पत्रकारिता लोकशाहीला घातक आहे, असे मत मधुकर भावे यांनी यावेळी येथे बोलताना व्यक्त केले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना प्रमोद जठार आणि भाजप, शिवसेनेवर जोरदार टीका
केली. (प्रतिनिधी)
पहिला बाण मोदींना : मधुकर भावे
धर्माचा आणि रामाचा संबंधच काय? असा सवाल करीत मधुकर भावे यांनी भाजपवर तोफ डागली. भाजपाएवढे खोटारडे लोक कुठेही सापडणार नाहीत. देश स्वयंपूर्ण करण्याचे काम काँग्रेसने केले. मात्र रामाच्या नावाने राजकारण करणारे भाजपवाले सत्तेवर येताच रामाला विसरले. राम पुन्हा जन्मला तर पहिला बाण मोदीला आणि दुसरा गडकरीलाच मारेल. १२ वर्षे मुख्यमंत्री असताना साबरमती स्वच्छ न करू शकलेले मोदी गंगा काय स्वच्छ करणार? असा सवालही त्यांनी केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे लबाड कंपनीचे एम.डी. आहेत, अशी टीका भावे यांनी केली.