५०० कोटी कुठे आहेत? : नीतेश राणे
By Admin | Updated: July 28, 2015 00:28 IST2015-07-27T22:52:03+5:302015-07-28T00:28:21+5:30
दीपक केसरकरांना सवाल

५०० कोटी कुठे आहेत? : नीतेश राणे
कणकवली : पालकमंत्री केसरकर ५०० कोटी रूपये आणल्याचे सांगत आहेत. तो कुठे वर्ग झाला आहे ते पालकमंत्र्यांनी सांगावे. आम्ही खुल्या व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार आहोत. मात्र, जनतेची दिशाभूल करू नये, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी केले आहे. पालकमंत्री केसरकर गेल्या आठ महिन्यांत ५०० कोटी रूपयांचा निधी आणल्याचे सांगत कोणाला खूष करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे समजत नाही. हा निधी प्रस्तावित आहे की वर्ग झाला आहे हेही सिंंधुदुर्गच्या जनतेला केसरकर यांनी सांगावे. कॉँग्रेस पुढील जिल्हा नियोजन बैठकीत याबद्दल जाब विचारणार आहे. ग्रामविकास खात्यांतर्गत निधी आणण्यात शिवसेनेचा काहीही सहभाग नाही, असे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे स्पष्ट म्हणणे आहे. कुठल्याही अधिकाऱ्याकडे निधी वर्ग झाल्याची अद्याप माहिती नाही. विकास करायचा असेल तर आम्ही तुम्हाला प्रामाणिक साथ देऊ. पण जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करत जिल्हा नियोजनमध्ये लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवण्याचे काम करत असाल तर आम्ही नक्कीच तुमच्या आडवे येऊ, असे पालकमंत्री केसरकर यांना आमचे सांगणे आहे. नारायण राणे यांनी काय केले याचा आढावा पालकमंत्री अधिकाऱ्यांकडून घेऊ शकतात. सर्वसामान्य जनताही सांगेल, असे नीतेश राणे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)