दुचाकीसमोर जेव्हा बिबटे उभे ठाकतात...
By Admin | Updated: July 27, 2015 00:20 IST2015-07-26T22:08:22+5:302015-07-27T00:20:45+5:30
आंबतखोलची घटना : शिकस्तीने वाचवला स्वारांनी आपला जीव

दुचाकीसमोर जेव्हा बिबटे उभे ठाकतात...
सावर्डे : आपल्या मित्रासमवेत घरी निघालेल्या तरुणांचा रस्त्यावर बसलेल्या बिबट्याने पाठलाग केला. मोटारसायकलस्वाराने प्रसंगावधान राखून आपला जीव वाचवण्यासाठी धूमस्टाईलने गाडी चालवत बिबट्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. ही घटना चिपळूण तालुक्यातील आंबतखोल रस्त्यावर नुकतीच घडली.आंबतखोल (गुजरवाडी) येथे राहणारा मनोज मोहन सालेकर (२९) हा चिपळूण येथे एका खासगी कंपनीत नोकरी करतो. नेहमीप्रमाणे आपली ड्युटी संपवून तो सायंकाळी ६ वाजता सावर्डेत आला होता. तेथे काही कामानिमित्त थांबला तेथील काम उरकून रात्री साडेआठच्या सुमारास तो सावर्ड्यातून त्याचा मित्र ओंकार विजय राणे (१९, आंबतखोल, गुजरवाडी) याला बरोबर घेऊन घरी निघाला. याच दरम्यान त्याची गाडी आंबतखोल येथील निर्जन ठिकाणी आली असता समोर दोन बिबटे रस्त्यातच बसलेले त्यांच्या निदर्शनास आले. हे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अखेर त्यांनी आपली गाडी बिबट्याच्या बाजूने काढली खरी पण त्यातील एका बिबट्याने त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.बिबट्या आपला पाठलाग करत असल्याचे मागे बसलेल्या मनोजचा मित्र ओंकार राणे याच्या निदर्शनास आले. त्यांनी आपला मित्र मनोज याला याबाबतची सूचना केली. दोघांचीही पाचावर धारण बसली. दोघांनीही आरडाओरड करत प्रसंगावधान राखून आपला जीव वाचवण्यासाठी धुमस्टाईलने गाडी हाकली. मोठ्या बाका प्रसंगाला तोंड देऊन सुटकेचा नि:श्वास टाकला.
घरी पोहोचताच घडल्या प्रकाराबाबत घरातील तसेच वाडीतील लोकांना याबाबत सर्व काही कथन केले. त्यांच्यावर आलेला बाका प्रसंग ऐकून आंबतखोल गावातील संपूर्ण ग्रामस्थ भयभीत झाले. ग्रामस्थांनी याबाबतची खबर वन अधिकाऱ्यांना दिली. खबर मिळताच सावर्डाचे वनपाल अधिकारी नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबरच घटनास्थळी धाव घेतली व ग्रामस्थांना रात्री या रस्त्यावरुन ये-जा करु नका, असा सल्ला दिला. (वार्ताहर)