स्वार्थासाठी दैवते बदलणाऱ्यांना टीकेचा काय अधिकार?

By Admin | Updated: July 30, 2014 22:58 IST2014-07-30T22:52:25+5:302014-07-30T22:58:50+5:30

सतीश सावंत : शिवसेनेबाबत कायमच अवहेलना, दीपक केसरकरांना टोला

What is the right to criticize those who change Gods for selfishness? | स्वार्थासाठी दैवते बदलणाऱ्यांना टीकेचा काय अधिकार?

स्वार्थासाठी दैवते बदलणाऱ्यांना टीकेचा काय अधिकार?

कणकवली : दहशतवादाच्या मुद्यावरून आमदार दीपक केसरकर सिंधुदुर्ग जिल्ह्याला बदनाम करीत आहेत. येथील विकासात अडथळा आणण्याचे काम आतापर्यंत त्यांनीच केले आहे असा आरोप करतानाच आपल्या स्वार्थाप्रमाणे दैवते बदलणाऱ्या केसरकरांना नारायण राणे यांच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही, असा टोला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे.
येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, दीपक केसरकर नारायण राणे यांच्यावर विनाकारण टीका करीत आहेत. भगवी टोळी म्हणून आतापर्यंत शिवसेनेची अवहेलना करणाऱ्या केसरकरांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणांवर नतमस्तक व्हावे असे आता वाटत आहे. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर जाहीर कार्यक्रमात केसरकर यांनी कधी साधी श्रद्धांजलीही त्यांना वाहिलेली नाही. आपल्या स्वार्थाप्रमाणे दैवते बदलण्याची सवय केसरकर यांना आहे. १९९७ मध्ये नगराध्यक्ष तसेच २००९ मध्ये आमदार होण्यासाठी ते नारायण राणे यांच्यासमोर नतमस्तक झाले होते. तर २००९ मध्येच प्रविण भोसलेंना डावलून आपल्याला आमदारकी मिळावी यासाठी शरद पवार तसेच अजित पवार यांच्याही चरणाशी ते नतमस्तक झालेले जनतेने पाहिले आहे.
भविष्यात आदित्य ठाकरे यांच्या चरणांशी नतमस्तक झालेले केसरकर जनतेला पहायला मिळतील. त्यांना जनतेबद्दल तसेच विकासाबाबत काहीही सोयरसुतक नाही. एक अकार्यक्षम आमदार म्हणूनच त्यांची ओळख निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीने मंत्री करावे म्हणून नारायण राणे यांच्यावर यापूर्वी ते टीका करीत होते. त्यामुळे राणेंचे नाव न घेता केसरकर यांनी जिल्ह्यात राजकारण करून दाखवावे.
तिलारी येथून सावंतवाडी, मालवण, कुडाळ या तालुक्यात नळयोजनेद्वारे करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेला केसरकर यांनीच विरोध केला होता. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून आपण पुन्हा निवडून येवू शकत नाही हे माहित असल्यानेच त्यांची राणेंवर टीका सुरु आहे. शिवराम दळवी यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे आपल्याला पुन्हा आमदारकीचे तिकिट मिळणार नाही हे समजल्यानेच त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. दहशतवादाच्या गोष्टी करणाऱ्या केसरकरांनी सावंतवाडीपुरता तरी शिवसेनेतला दहशतवाद प्रथम थांबवून दाखवावा.
त्यांना दहशतवाद पहायचा असेल तर त्यांनी बेळगाव येथील येळ्ळूर येथे जावे. आपल्यामुळे शिवसेनेला लोकसभेत मताधिक्य मिळाल्याचा भ्रम त्यांना झाला असून हा भ्रमाचा भोपळा आगामी निवडणुकीत निश्चितच फुटेल असे सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले. (वार्ताहर)

Web Title: What is the right to criticize those who change Gods for selfishness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.