कणकवली : आमचे स्वतःचे व्यवसाय असतात. स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले असतील तर त्यात चूक काय? प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून पाहू नये,आमच्या पक्षाची कोणीही बदनामी करू नये. प्रत्येकाचाच काही ना काही व्यवसाय असतो. जर कोणतेही नियम आम्हाला लागू होत असतील, तर ते नियम सर्वांनाच लागू झाले पाहिजेत, अशा शब्दांत पालकमंत्री नितेश राणे यांनी भूमिका मांडली आहे.मालवण येथे बुधवारी भाजपचे जिल्हा सचिव विद्याधर केनवडेकर यांच्या घरात जात तिथे मिळालेले पैसे हे मतदारांना वाटण्यासाठी असल्याचा आरोप आमदार नीलेश राणे यांनी केला होता. त्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरूवारी प्रसिद्धी माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिले.ते म्हणाले, रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना प्रत्येक जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात जावे लागते. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीकडे राजकीय चष्म्यातून पाहणे योग्य नाही. उद्या आम्ही उदय सामंत यांच्याबाबत काही बोललो आणि त्यावर असा धिंगाणा घातला, तर ते योग्य ठरेल का? असा सवालही करत जो न्याय आम्हाला असेल, तो न्याय त्यांना पण असेल, असे त्यांनी बजावले.युतीच्या संदर्भातील प्रश्नावर नितेश राणे म्हणाले, भाजपची निवडणुकीबाबत एक ठरलेली पद्धत आहे. ती सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे. हा संपूर्ण विषय प्रक्रियेचा भाग असून, स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांची मते घेतली जातात आणि त्यानंतर प्रस्ताव प्रदेश पातळीवर पाठवला जातो. त्यानंतर निर्णय होतो.राजघराण्याबाबत ते भावनिकआमदार दीपक केसरकर यांच्या आजारपणाचा आणि निवडणुकीचा काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करताना मंत्री राणे म्हणाले की, दीपक केसरकर यांनी मी सावंतवाडीतील राजघराण्याशी संबंधित नाही, उमेदवारांशीही माझा काही संबंध नाही, असे जाहीर करावे. राजघराण्याबाबत ते भावनिक आहेत, असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.
Sindhudurg: व्यवसायामुळे घरात पैसे ठेवल्यास चूक काय?, राजकीय चष्म्याने पाहू नका - नितेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 13:12 IST