शहरासाठी विरोधकांचे योगदान काय ?
By Admin | Updated: July 10, 2014 23:46 IST2014-07-10T23:41:52+5:302014-07-10T23:46:52+5:30
माधुरी गायकवाड यांचा मनसे पदाधिकाऱ्यांना सवाल

शहरासाठी विरोधकांचे योगदान काय ?
कणकवली : कणकवली नगरपंचायतीमार्फत शहरातील दैनंदिन कचरा उचलण्याबरोबरच आरोग्याशी संबंधित कामे सातत्याने सुरू आहेत. त्यामध्ये खंड पडू नये यासाठी कर्मचाऱ्यांबरोबरच नगरसेवक दक्ष आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या कारभारावर विनाकारण टिकाटिप्पणी करणाऱ्यांनी शहरासाठी आपले योगदान काय? याची पडताळणी अगोदर करावी आणि त्यानंतरच टीका करावी, असा टोला नगरपंचायतीच्या आरोग्य सभापती माधुरी गायकवाड यांनी विरोधकांचे नाव न घेता लगावला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन नगरपंचायतीच्या कारभाराबाबत टीका केली होती. याला आरोग्य सभापती माधुरी गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उत्तर दिले आहे. या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, केवळ जाहिरातबाजी करण्यासाठी विरोधकांकडून टीका केली जात आहे. या विरोधकांनी शहरातील लोकांच्या चिंतेपोटी ही टीका केली आहे का? हे स्पष्ट होत नाही.
तर स्वत:ला आरोग्य सुविधांबाबत ठेका मिळण्यासाठी ही टीका केल्याचे दिसून येत आहे. आमच्या कामातील पारदर्शी व प्रामाणिकपणा जनतेला ज्ञात असून त्यांनी तो जवळून अनुभवला आहे. त्यांचा आमच्या कार्यावर विश्वास आहे.
त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीच्यावेळी अनामत रक्कम जप्त झालेल्या पक्षाने उगीचच जनकल्याणाची चिंता असल्याचे भासवून स्वत:चे हसे करून घेऊ नये, असाही टोला या प्रसिद्धीपत्रकाद्वारे लगावला आहे. (वार्ताहर)