वहाळ ग्रामस्थांच्या एकोप्यापुढे दारूचीही काय बिशाद ?
By Admin | Updated: March 1, 2015 23:16 IST2015-03-01T22:14:54+5:302015-03-01T23:16:23+5:30
चिपळूण तालुका : पन्नास वर्षे झालेला एक निश्चय अन् ध्यास--तंटामुक्त अभियान

वहाळ ग्रामस्थांच्या एकोप्यापुढे दारूचीही काय बिशाद ?
मेहरून नाकाडे- रत्नागिरी -चिपळूण तालुक्यातील नऊ मोठ्या व दोन पोटवाड्यांतर्गत वसलेले २ हजार ५११ लोकवस्तीचे ‘वहाळ’ गाव. गावामध्ये गणेशोत्सव, शिमगोत्सवाबरोबर प्रत्येक सण लोक सहभागातून आनंदाने साजरे केले जातात. शिवाय कोणताही निर्णय असो सामोपाचारने निर्णय घेणे व संपूर्ण गावाने त्याची एकजुटीने अंमलबजावणी करणे जणू वहाळ गावाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. ग्रामपंचायत स्थापनेपासून निवडणुका बिनविरोध पार पाडल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर ५० वर्षे गावात दारूबंदी करण्यात आली आहे. म्हणून वहाळ गावाची तंटामुक्त पुरस्कारासाठी (२०१३-१४) निवड झाली आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त अभियान २००७ साली सुरू करण्यात आले त्यावेळेपासूनच गावात तंटामुक्त अभियान राबवण्यात येत आहे. गावातील शांतता जपण्यासाठी तंटामुक्त समिती दरवर्षी स्थापन करण्यात येते. शिवाय नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी दरवर्षी समितीची कार्यकारिणी बदलण्यात येते. शासकीय असो वा सांस्कृतिक प्रत्येक उपक्रमात ग्रामस्थ एकजुटीने सहभागी होतात. गावामध्ये तंटे होऊ नयेत, यासाठी समिती कार्यरत आहे. शिवाय किरकोळ एखादा तंटा उद्भवलाच, तर समिती एकत्र येऊन वाद सामोपचाराने मिटवते. पक्षकारही समितीने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करतात.
गावामध्ये ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात आले असून, गावातील दहा व्यक्तींची त्यामध्ये निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीतर्फे या मंडळींसाठी विशेष पोशाख पुरवण्यात आले आहेत. गावामध्ये कोणताही कार्यक्रम असो वा उत्सव त्या कालावधीत कोठेही शांततेला गालबोट लागणार नाही किंबहुना शांतता प्रस्थापित करण्यासाठी ग्रामसुरक्षा दल कार्यरत असते. सण, उत्सवावेळी पोलीस बंदोबस्त असला तरी ग्रामसुरक्षादलाचे प्रतिनिधी आपापली जबाबदारी प्राधान्याने निभावतात.
वहाळ गावाने सफाई कामगार नियुक्त केले आहेत, शिवाय वाडीवार कचराकुंड्या बसवल्या आहेत. कचरा गोळा केल्यानंतर घनकचऱ्यापासून खतनिर्मिती केली जाते. सुरूवातीला गावातील मंडळींना खत देण्यात येत होते. मात्र, ग्रामपंचायतीने सार्वजनिक क्षेत्रात आंबा काजू व अन्य फळांची एक हजार झाडे लावली आहेत. अडीच वर्षांच्या झाडांचे संगोपन व देखभाल सुरू आहे. खताचा वापर या झाडांसाठी केला जातो.
गावाच्या एकूण लोकसंख्येपैकी निम्मी मंडळी गावात राहतात. परंतु, निम्मी मंडळी मुंबई व अन्य शहरात वास्तव्यास आहेत. सणासुदीला संबंधित मंडळी गावी परतते. परंतु ग्रामदेवता श्री वाघजाई देवीच्या मंदिरात ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयास सर्व मंडळी संमती
दर्शवतात.
आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याचा स्वीकार गावकरी मंडळी करतात. त्यांना कोणताही विरोध दर्शवला जात नाही. शिवाय गावामध्ये ७ ते ८ नमन मंडळे आहेत. मंडळाकडून कोणालाही सक्ती करण्यात येत नाही. स्वेच्छेने सहभागी होणाऱ्यांनाच सहभागी करून घेण्यात येते. प्लास्टिक मुक्ती अभियान, स्वच्छता अभियानाबरोबर गावात ५० वर्षांपूर्वी केलेली दारूबंदी आजही कायम आहे.
गावामध्ये ग्रामपंचायतीची स्थापना १९५७ साली झाली. तेव्हापासून ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध सुरू आहेत. गावपॅनेलचे वर्चस्व आहे. अन्य सार्वत्रिक निवडणुकीवेळी मात्र एकमुखी निर्णय घेण्यात येतो. त्यामुळे गावात शांतता नांदत आहे. ग्रामस्थांच्या निर्णयाला मुंबईकरही संमती दर्शवत आहेत.
- संजय महादेव शेलार,
सरपंच ग्रामपंचायत, वहाळ
प्रत्येक सार्वजनिक, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ग्रामस्थांचा सहभाग उल्लेखनीय असतो. बचतगटांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवण्यात येतात. शिवाय प्लास्टिक मुक्ती, स्वच्छता अभियानातही महिलांचा सहभाग असतो. त्यामुळे कोणतीही शासकीय योजना असो वा कार्यक्रम ग्रामस्थांच्या सहभागामुळे सर्वसामान्यांपर्यत पोहोचवणे सुलभ होते.
- जान्हवी मंदार आंबेकर, ग्रामसेविका.
गावामध्ये तंटे उद्भवतच नाही, किरकोळ तंटा उद्भवला तरी गावपातळीवरच सोडवले जातो. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ग्रामसुरक्षा दलाचे कामही उत्कृष्ट आहे. दारूबंदीचा निर्णय ५० वर्षांपूर्वी घेण्यात आला होता, अद्याप हा निर्णय कायम आहे. शिवाय व्यसनमुक्तीसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमही राबवण्यात येते.
- आनंदा सकपाळ,
अध्यक्ष तंटामुक्त समिती, वहाळ
गावामध्ये १०० टक्के तंटामुक्ती असल्याने शांतता नांदते आहे. एखादी समस्या उद्भवलीच तर ती सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. गेली १६ वर्षे पोलीसपाटील म्हणून कार्यरत आहे. गावात कोणतेही वाद उद्भवलेले नाहीत. आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याला स्वीकारले जाते. छोट्या मोठ्या कारणावरून वाद होत नाहीत.
- रामजी महादेव पवार, पोलीसपाटील, वहाळ