कोकण साहित्य यात्रेचे रत्नागिरीत स्वागत
By Admin | Updated: November 17, 2015 00:04 IST2015-11-16T21:33:54+5:302015-11-17T00:04:26+5:30
कोमसाप : करुळ ते मुंबई होणार साहित्याचा जागर

कोकण साहित्य यात्रेचे रत्नागिरीत स्वागत
रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त करुळ ते मुंबई अशी कोकण साहित्य यात्रा काढण्यात आली. रत्नागिरी येथे या साहित्य यात्रेचे आज (सोमवारी) स्वागत करण्यात आले. आमदार उदय सामंत, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्याध्यक्षा नमिता कीर, विश्वस्त अरूण नेरुरकर, भास्कर शेट्ये यांनी साहित्य यात्रेचे स्वागत केले.
पटवर्धन हायस्कूल येथे साहित्य यात्रेचे आगमन होताच ढोल वादनाने स्वागत करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय कार्याध्यक्ष नमिता कीर यांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. विश्वस्त भास्कर शेट्ये व अरुण नेरुरकर यांनी साहित्य दिंडीला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर पटवर्धन हायस्कूलच्या सभागृहात दिंडीचे आगमन झाल्यानंतर स्वागत सोहळा पार पडला. गजानन पाटील यांनी प्रास्ताविकात साहित्य यात्रेचा उद्देश व मार्ग याबाबत माहिती दिली. २० ते २२ नोव्हेंबरअखेर दादर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनापूर्वी दिंडी मुंबईत पोहोचणार असल्याचे सांगितले.
कोमसापची स्थापना २५ वर्षांपूर्वी मधु मंगेश कर्णिक यांनी केल्याचे कोमसाप केंद्रीय कार्याध्यक्षा नमिता कीर यांनी सांगितले. रौप्य महोत्सव साजरा करीत असतानाच करुळ ते मुंबई साहित्याचा जागर आयोजित केला असून, सोळावे साहित्य संमेलन मुंबईत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार उदय सामंत यांनी मार्गदर्शन करताना २५ वर्षांपूर्वी कोमसापची मधु मंगेश कर्णिक यांनी मुहूर्तमेढ रोवली असून, त्याला पुढे नेण्याचे व राजाश्रय देण्याचे कर्तव्य आमचे असल्याचे सांगितले. वाचन संस्कृ ती व सांस्कृतिक कार्य वाढवित असताना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ज्येष्ठ मंडळींनी मुलांसमवेत संवाद साधण्याची अपेक्षा व्यक्त केली. लहान मुले केवळ अनुकरणप्रिय असतात. पडद्यावरील व्यक्तींची ओळख होते. मात्र, स्थानिक संस्था ज्येष्ठ मंडळींनी जर त्यासाठी पुढाकार घेतला तर निश्चितच मुलांवर चांगले संस्कार होतील, असे सांगितले.
साहित्य यात्रेत रौप्यमहोत्सव कमिटीचे अध्यक्ष व ज्येष्ठ कवी प्रा. एल. व्ही. पाटील व कवी अ. वि. जंगम सहभागी झाले आहेत. ज्येष्ठ कवी प्रा. एल. व्ही. पाटील यांनी मार्गदर्शन करीत असताना कोमसाप केवळ कोकणाची नाही, तर अवघ्या महाराष्ट्राची आहे, असे सांगितले. कवी, लेखक यांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम कोमसाप करीत आहे. साहित्य संमेलनामध्येही अनेक नवोदित कवींना सन्मान दिला आहे. बोली भाषा, विचार, तत्व यांना एकत्र करण्याचे काम कोमसाप करीत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी काही कविता सादर केल्या. यात्रेच्या स्वागताचे औचित्य साधून विश्वस्त भास्कर शेट्ये, अरूण नेरुरकर, ज्येष्ठ कवी एल. व्ही. पाटील, कवी अ. वि. जंगम, आमदार उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला. विनायक हातखंबकर यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी उपनगराध्यक्ष संजय साळवी, नगरसेवक राहुल पंडित, सलील डाफळे, कोमसापचे जिल्हाध्यक्ष सुरेश खटावकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रत्नागिरीत पारंपारिक ढोलवादनाने स्वागत.
दादर येथील साहित्य संमेलनापूर्वी दिंडी मुंबईत पोहोचणार.
कोमसापकडून बोली भाषा, विचार, तत्व यांना एकत्र आणण्याचे काम :पाटील.
कोमसापला राजाश्रय देण्याचे काम आमचे : सामंत.