‘डबलडेकर’चे जल्लोषी स्वागत
By Admin | Updated: December 7, 2015 00:14 IST2015-12-06T23:14:49+5:302015-12-07T00:14:53+5:30
भाजपची पाठ : मळगाव रेल्वे स्थानकात शिवसैनिकांनी साजरा केला आनंदोत्सव

‘डबलडेकर’चे जल्लोषी स्वागत
सावंतवाडी : खास कोकणवासीयांसाठी सुरू केलेल्या डबलडेकर ट्रेनचा प्रारंभ गोवा-मडगाव येथून झाल्यानंतर सावंतवाडी-मळगाव रेल्वेस्थानक येथे तालुक्याच्यावतीने व शिवसैनिकांच्यावतीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी व प्रवाशांनी आनंदोत्सव साजरा केला. शिवसैनिकांच्या आनंदोत्सवात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र पाठ फिरवल्याचे दिसून आले.
नगराध्यक्ष बबन साळगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, संपर्कप्रमुख राजू नाईक, शिवसेना शहरप्रमुख शब्बीर मणियार, पंचायत समिती सदस्य अशोक दळवी, लवू भिंगारे, कोकण रेल्वे वरिष्ठ अभियंता पी. एन. माळी, शाम तोडकर, जी. व्ही. तेली, मळगाव सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, सुनील गावडे, दिलीप सोनुर्लेकर, अजित सांगेलकर, आनंद देवळी, सोनू राऊळ, विजय राऊळ, प्रभाकर सामंत, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी डबलडेकर रेल्वे गोवा मडगाव ते लोकमान्य टिळक मुंबईपर्यंत धावण्याची अधिकृत घोषणा २९ डिसेंबर रोजी केली होती. त्यानुसार त्याचा प्रारंभ गोवा-मडगाव येथून रविवारी करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मळगाव रेल्वेस्थानकावर शिवसेनेच्यावतीने या रेल्वेचे भव्य स्वागत करण्यात आले. (वार्ताहर)
दोन स्थानकावर थांबा
डबलडेकर रेल्वेला सावंतवाडी व कणकवली या दोनच ठिकाणी थांबा आहे. डबलडेकर रेल्वे रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता सावंतवाडीतील मळगाव रेल्वेस्थानकावर आली. दरम्यान, यावेळी रेल्वेचे झेंडा फडकावून स्वागत करण्यात आले. शिवसैनिकांनी सायंकाळपासूनच गर्दी करण्यास सुरूवात केली होती. मात्र, या गर्दीत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते कुठेच दिसत नव्हते. त्यामुळे हा आनंदोत्सव शिवसेनेचे कार्यकर्तेच साजरा करताना दिसत होते.