रत्नागिरी-मडगाव रेल्वे बंद पडण्याच्या मार्गावर
By Admin | Updated: July 7, 2015 23:05 IST2015-07-07T23:05:32+5:302015-07-07T23:05:32+5:30
कोकण रेल्वे : भारमान नसल्याने रेल्वे प्रशासनाकडून गंभीर दखल

रत्नागिरी-मडगाव रेल्वे बंद पडण्याच्या मार्गावर
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून रात्रीच्या वेळी धावणारी रत्नागिरी - मडगाव पॅसेंजर रेल्वे भारमान नसल्याने डबघाईस आली आहे. ३१ मार्च २०१५ला सुरू करण्यात आलेली ही गाडी अवघ्या तीन महिन्यात बंद पडण्याच्या अवस्थेत आली असून, भारमान नसल्याने ही गाडी बंद करण्याचा विचार कोकण रेल्वे व्यवस्थापन गांभीर्याने करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दादरहून रत्नागिरी येथे मध्यरात्री येणारी पॅसेंजर गाडी पुढे मडगाव - मंगलोेरपर्यंत विस्तारित करण्याचा कोकण रेल्वे प्रशासनाचा विचार होता. मात्र, ही बातमी रत्नागिरीवासीयांना समजताच या प्रस्तावाला तीव्र विरोध सुरू झाला. येथील प्रवाशांबरोबरच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेतर्फेही ही गाडी पुढे नेण्यास विरोध करण्यात आला. त्यामुळे काही काळ याबाबतची फाईल बंद झाली होती. मात्र, त्यानंतर दादरवरून रात्री येणारी दादर पॅसेंजर रत्नागिरीपर्यंत आल्यानंतर येथून ती पुढे मडगावला सोडण्यात येऊ लागली, तर मडगाव येथे असलेली दुसरी रेल्वे सायंकाळी ७ वाजता मडगाव स्थानकातून सोडली जात असून, ती रात्री १ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी स्थानकात येते. ही गाडी पहाटे ५.३० वाजता रत्नागिरी - दादर म्हणून सोडली जाते. दादर ते रत्नागिरीपर्यंत धावणारी ही पॅसेंजर रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी महत्त्वाची आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुसंख्य लोक या गाडीने प्रवास करतात. रत्नागिरी स्थानकातच ही गाडी ‘फुल्ल’ असते. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच स्थानकांवर या गाडीसाठी असंख्य प्रवासी प्रतीक्षेत असतात. ही पॅसेंजर गाडीही रत्नागिरीकरांसाठी पुरेशी नसल्याने रत्नागिरीहून दादरपर्यंत आणखी एक रेल्वेगाडी सुरू करावी, अशी जुनी मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. तसेच चिपळूण - मुंबई रेल्वेही सुरू करावी, अशी मागणी गेल्या काही काळापासून जिल्हावासीयांतून सुरू आहे. या मागण्यांचा अद्यापही विचार झालेला नाही. मात्र, रत्नागिरीसाठी असलेली दादर पॅसेंजर गाडीही पळविण्याचा प्रयत्न झाला. तो यशस्वी झाला नाही म्हणून छुप्या पध्दतीने रात्रीच्या वेळी ही गाडी मडगावपर्यंत पुढे नेली जात आहे. मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांना मडगावपर्यंत जाता यावे, असा उद्देश यामागे होता. या गाडीला उन्हाळी हंगामात कोकणवासीयांची गर्दी असतानाच मडगावकडे जाणारे प्रवासीही गर्दी करीत होते. आता पावसाळ्यात रत्नागिरी ते मडगाव व मडगाव ते रत्नागिरी या गाडीला भारमान नसल्याने तीन महिन्यात ही गाडी बंद करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
दादर पॅसेंजर जाणार
होती मंगलोरपर्यंत...
दादरहून रत्नागिरीपर्यत धावणारी पॅसेंजर गाडी चक्क मंगलोरपर्यंत नेण्याचा घाट प्रथम घातला गेला होता. मात्र, वेळेचे गणित न जमल्याने अखेर मडगावपर्यंत हीच गाडी पुढे नेण्यात येत आहे. दादर - मडगाव असे या गाडीला नाव न देता रत्नागिरी - मडगाव असे नाव देण्यात आले आहे. त्यामागे रत्नागिरीकरांचा रोष नको, हे समीकरण असल्याचीही चर्चा आहे.