बुरंबावडेतील पाणीप्रश्नी हालचाली
By Admin | Updated: December 30, 2014 23:23 IST2014-12-30T22:07:41+5:302014-12-30T23:23:35+5:30
दीपक केसरकरांचे आदेश : राष्ट्रीय पेयजलअंतर्गत अंदाजपत्रक तयार करा

बुरंबावडेतील पाणीप्रश्नी हालचाली
फणसगाव : बुरंबावडे गावामध्ये दरवर्षी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात. बुरंबावडे गावामध्ये जवळ असणाऱ्या वेळगिवे गावामध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने तेथून बुरंबावडे येथील साठवण टाकीमध्ये पाणी पुरवठा केला जातो. परंतु ही साठवण टाकी उंच ठिकाणी असल्याने तेथे पाणी पोचत नाही व गावाला पाण्यापासून वंचित रहावे लागते. त्यासाठी या टाकीच्या खालील बाजूस नवीन साठवण टाकी बांधण्याकरिता राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत अंदाजपत्रक तयार आहे. या अंदाजपत्रकला तत्काळ मान्यता देण्याचे आदेश केसरकर यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता देशमुख यांना दिले.
देवगड तालुक्यातील बुरंबावडे ग्रामपंचायतीस भेट देऊन व बुरंबावडे गावाबरोबर फणसगाव परिसरातील समस्यांसंदर्भात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत केसरकर यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. आमदार वैभव नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख अॅड. हर्षद गावडे, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर, सरपंच अक्षता जाधव, उपसरपंच सत्यवान नार्वेकर, फणसगाव सरपंच उदय पाटील, पोंभुर्ले सरपंच सादिक डोंगरकर, बुरंबावडे ग्रामसेवक माने आदी उपस्थित होते. फणसगाव भागात शेतीपंपाची वीज जोडणी व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाची वीज जोडणीचे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. याबाबत संदीप बांदिवडेकर यांनी प्रश्न मांडला.
फणसगाव सरपंच उदय पाटील यांनी बीएसएनएल टॉवर होणे, प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा तंत्रज्ञ नेमण्यात यावा, तसेच गोसावीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे आदी प्रश्न उपस्थित केले. तसेच फणसगाव येथे बीएसएनएल टॉवर होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगून गोसावीवाडी रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
तसेच देवगड ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा लवकरच मिळणार असल्याने याठिकाणी सद्यस्थितीत ३० बेड उपलब्ध असून अजून एकूण ५० बेड उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी केली. यावर आरोग्य विभागामार्फत आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यास सुचविले.
पोंभुर्ले सरपंच सादीक डोंगरकर यांनी पोंभुर्ले शाळेतील शिक्षक वेळेत न उपस्थित राहणे व गैरहजर राहत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कामात चुकारपणा करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. ग्रामस्थांनी बुरंबावडे शाळेची नवीन इमारत, सुसज्ज ग्रामपंचायत इमारत बांधणे आदींसह अनेक प्रश्न उपस्थित केले. यावर केसरकर यांनी संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यास सुचविले व इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी देवगड तहसीलदार जीवन कांबळे, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता छाया नाईक, ग्रामीण पाणी पुरवठा प्रभारी कार्यकारी अभियंता देशमुख, सहाय्यक गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, तालुका कृषी अधिकारी तांदळे, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता मोहिते, फणसगाव महावितरणच्या कनिष्ठ अभियंता छाया परब, गटशिक्षणाधिकारी नदाफ, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक जाधव उपस्थित होते. बुरंबावडे ग्रामपंचायतीच्यावतीने पालकमंत्री केसरकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक उदय दुधवडकर तर आभार अरूण दुधवडकर यांनी
मानले. (वार्ताहर)
बुरंबावडेसाठी स्वतंत्र तलाठ्याची मागणी -रस्ता दुरूस्तीचे आदेश
बुरंबावडे ते तळेरे वाघाचीवाडी हा मार्ग सुमारे ३ किलोमीटर असून या मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एसटी बस सेवा बंद होण्याची वेळ आलेली आहे. हा मार्ग बुडीत धरण क्षेत्रात जाणारा असल्याने यासाठी निधी उपलब्ध होऊ शकणार नाही.
ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या मार्गाची तत्काळ दुरूस्ती करण्याचे आदेश जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केसरकरांनी दिले.
नुकसान भरपाईचे आदेश
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोडकळीस आलेले विजेचे खांब, लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या व उघडे ट्रान्सफॉर्मर यांमुळे विजेचा धक्का बसून गुरे व ग्रामस्थ मृत होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे उघड्या ट्रान्सफॉर्मरवर तत्काळ गार्डीन बसविण्यात यावेत. तसेच या भागात विजेचा धक्का लागून तीन गुरे दगावली आहेत. यांचे पंचनामे झाले असून त्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आदेश केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
नुकसान भरपाईचे आदेश
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोडकळीस आलेले विजेचे खांब, लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या व उघडे ट्रान्सफॉर्मर यांमुळे विजेचा धक्का बसून गुरे व ग्रामस्थ मृत होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे उघड्या ट्रान्सफॉर्मरवर तत्काळ गार्डीन बसविण्यात यावेत. तसेच या भागात विजेचा धक्का लागून तीन गुरे दगावली आहेत. यांचे पंचनामे झाले असून त्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आदेश केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.