झाराप-पत्रादेवी महामार्गावर पाणी
By Admin | Updated: July 12, 2014 00:26 IST2014-07-12T00:06:56+5:302014-07-12T00:26:44+5:30
पाणी साचल्याने अपघात शक्यता

झाराप-पत्रादेवी महामार्गावर पाणी
बांदा : झाराप- पत्रादेवी चौपदरी महामार्गावर बांदा-सटमटवाडी येथे लगतच्या डोंगरातील माती व पाणी महामार्गावर वाहून आल्याने महामार्ग जलमय झाला आहे. महामार्गावर पाणी साचल्याने याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. झाराप -पत्रादेवी महामार्गाच्या कामाच्या मर्यादा पावसात उघड पडल्या आहेत. महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने हे अपघातांना निमंत्रण ठरत आहे. सटमटवाडी येथे डोंगरातील माती ही पाण्याबरोबर वाहून येत असल्याने याठिकाणी लाखो रुपये खर्चून संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे.
मात्र, उन्हाळयात ही भिंत फोडण्यात आल्याने आज झालेल्या मुसळधार पावसात डोंगरातील माती पाण्याबरोबर महामार्गावर वाहून आली आहे. यामुळे महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या मार्गावरुन वाहन चालविणे वाहनचालकांना कसरतीचे ठरत आहे. मुसळधार पावसामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने महामार्ग जलमय बनला आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास पावसाळ्यात डोंगरातील माती मोठ्या प्रमाणात महामार्गावर येण्याचे शक्यता आहे. महामार्गावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी महामार्ग उपविभागाकडून उपाययोजना होणे गरजेचे आहे. अन्यथा याठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)
पावसामुळे शेर्ले पुलावरील वाहतूक बंद
बांदा : बांदा शहर व परिसरात काल रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. शेर्ले-कापईवाडी येथील जुन्या पुलावर दुपारी तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होती. सायंकाळी उशिरा या पुलावरील पाणी ओसरले.
शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरीप सुरुच होती. दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने तेरेखोल नदीचे पात्र प्रवाहीत झाले. शेर्ले -कापईवाडी येथील जुन्या पुलावर दुपारी पावसाचे पाणी होते. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होती. शेर्ले येथे जाण्यासाठी वाहनांना मोठ्या नवीन पुलाचा आधार घ्यावा लागला. सायंकाळी पाऊस कमी झाल्याने पुराचे पाणी ओसरले. मुसळधार पावसामुळे या
परिसरात जनजीवन विस्कळीतझाले. (प्रतिनिधी)