मालवण: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे जल पर्यटन सल्लागार डॉ. सारंग कुलकर्णी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याची माहिती समोर येताच समाजातील सर्वच स्तरातून नाराजीच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनीही या घटनेची व्यक्तिशः दखल घेतली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान डॉ.सारंग कुलकर्णी हे पर्यटनाच्या माध्यमातून येथील जनतेच्या सेवेत राहावेत यासाठी मुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या सर्वच नेते मंडळींना साकडे घालण्यात येणार आल्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत म्हणाले. गतिमान कारभाराच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला शंभर दिवसांच्या कृती आराखड्याचे उद्दिष्ट दिले असताना पर्यटन विभागातील अनागोंदी कारभार पुढे आला आहे. पर्यटन विकासातून अर्थक्रांती आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य असल्याकारणाने केंद्र आणि राज्य सरकारने महाराष्ट्रात पर्यटनाचे अनेक प्रकल्प राबविण्याचे निश्चित केले आहे. यांत जल पर्यटनाचे अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. डॉ. सारंग कुलकर्णी यांच्या राजीनाम्यामुळे राज्यातील काहीं महत्वाकांक्षी जल पर्यटन प्रकल्पांना ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा दुरगामी परिणाम महाराष्ट्राच्या पर्यटन विकासावर होणार आहे.
पालकमंत्र्यांनी घेतली दखल..डॉ. सारंग कुलकर्णी यांच्या राजीनाम्याचे वृत्त समोर येताच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी याची तातडीने माहिती घेतली आहे. डॉ. कुलकर्णी यांच्या राजीनाम्याच्या घटनेत पालकमंत्री राणे व्यक्तिशः लक्ष घालणारं आहेत असल्याचे यावेळी त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे.कोकणचे भाग्यविधाते खासदार नारायण राणे यांनी डॉ. सारंग कुलकर्णी यांच्या राजीनामा प्रकरणात लक्ष घालावे यासाठी सिंधुदुर्ग मधील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील पुढाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. डॉ. कुलकर्णी यांनी राजीनामा दिल्यामुळे अनेकं जल पर्यटन प्रकल्पांना खीळ बनणार असल्याकारणाने या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
डॉ. कुलकर्णी सेवेत रहावे ही जनतेची इच्छा: दत्ता सामंत..खासदार नारायण राणे यांच्या संकल्पने नुसार पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्गचा विकास करताना सागरी संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी यांचे मोठे योगदान राहिले आहे. येथीलं तरुणांना सागरी पर्यटनातून रोजगार मिळावा यासाठी डॉ. कुलकर्णी यांचे विशेष प्रयत्न आहेत. डॉ. कुलकर्णी यांनीं आपल्या पदाचा दिलेला राजीनामा संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी हानिकारक आहे. त्यांनी एमटीडीसी मध्ये कार्यरत रहावे अशी आमची सर्वांची इच्छा आहे. यासाठी खासदार नारायण राणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे साकडे घालणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले.