चिपळुणात नाल्याचे पाणी घरांत
By Admin | Updated: October 3, 2015 22:51 IST2015-10-03T22:51:12+5:302015-10-03T22:51:12+5:30
मुसळधार पावसामुळे

चिपळुणात नाल्याचे पाणी घरांत
चिपळूण : शहरातील पाग भागात शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे भोसले चाळी जवळ असणारा नैसर्गिक नाला तुंबल्याने त्याचे पाणी भोसले चाळीतील घरांमध्ये शिरले. साडेचार लाखापेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इतर भागातही पावसाचे पाणी साचून नुकसान झाले आहे. शनिवारी दुसऱ्या दिवशीही पावसाने झोडपले.
शहरासह तालुक्यात पडलेल्या पावसाने गोवळकोट येथे निलेश रामचंद्र किंजळकर यांच्या म्हशीवर वीज पडून नुकसान झाले. कळंबस्ते येथे एका घरावर वीज पडून नुकसान झाले. बकेदरकर आळीत माधव चितळे यांच्या घराजवळ वीज पडल्याने परिसरातील घरांमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची नासधूस झाली. परशुराम येथे एका मोबाइल टॉवरवर वीज कोसळल्याचे वृत्त आहे.
पाग भोसळे चाळीत नाल्याचे पाणी घुसल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंसह, इलेक्ट्रिकल्स व इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची नासाडी झाली. घरातील घाणीचे पाणी व माती काढण्याचे काम आज दिवसभर सुरु होते. येथे १० कुटुंब आहेत. येथील नाल्यामध्ये झाडे झुडपे वाढल्याने शिवाय नाल्यात कचरा साचल्याने पाणी तुंबले . येथे असणारी संरक्षक भिंत कोसळून पाणी चाळीच्या दिशेने वळले. घरात पाणी साचल्याने रहिवाश्यांना रात्र जागून काढावी लागली. फ्रिज, वॉशिंग मशिन, टि. व्ही. सारख्या मौल्यवान वस्तूही पाण्यात भिजल्या. अभिजित सुरेश कवडे यांचं ३८ हजार ३०० रुपये, सुहासिनी कदम ४६ हजार ९६० रुपये, केतन पाटणे २२ हजार ९४० रुपये, गंगाराम खरात यांचे ४९ हजार ९०० रुपये, समिधा साळवी १ लाख २६ हजार ६०० रुपये, अरुणा सावंत यांचे ९५ हजार ७०० रुपये, लतिका लाहिम ६९ हजार १००रुपये नुकसान झाले. मोहन शिंदे यांची दुचाकी पाण्यात बुडाली. नुकसानीचा पंचनामा मंडल अधिकारी यु. एल. जाधव, तलाठी युवराज राजेशिर्के यांनी केला. ४ लाख ४९ हजार ५०० रुपयाचे प्राथमिक नुकसान आहे. चंद्रकांत आंबेकर यांचे घर बंद असल्याने नुकसानीचा आकडा समजला नाही. (वार्ताहर)
पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची आज नगराध्यक्षा सावित्री होमकळस, बांधकाम सभापती बरकत वांगडे, गटनेते राजेश कदम, अभियंता सुहास कांबळे, आरोग्य निरिक्षक अशोक साठ,े नगरसेविका आदिती देशपांडे, रुक्सार अळवी, नगरसेवक शशिकांत मोदी, माजी नगरसेविका सीमा चाळके आदींनी पहाणी केली.
चाळीमध्ये पाणी घुसुन नुकसान झाल्याचे समजताच हॉटेल व्यावसायिक एस. एम. तटकरे यांनी प्रत्येक कुटुंबाला सकाळचा नास्ता, दुपारचे जेवण, २५ किलो तांदुळ व इतर किराणा सामान दिले. त्यांच्या दातृत्वाबद्दल रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. आज शनिवारी सकाळ पर्यंत ७५.२२ मिमी पाऊस पडला तर चालू मोसमात एकूण २६५५.७७मि मी पावसाची नोंद झाली आहे.