आंबेरी पुलावर पाणी ; वाहतूक खोळंबली
By Admin | Updated: September 7, 2014 00:36 IST2014-09-07T00:21:56+5:302014-09-07T00:36:57+5:30
दिवसभर संततधार सुरु

आंबेरी पुलावर पाणी ; वाहतूक खोळंबली
माणगाव : शुक्रवारी रात्रीपासून माणगाव खोऱ्यात संततधार पावसाने सुरुवात केली आहे. दिवसभर सुरु असणाऱ्या या पावसामुळे माणगाव कुडाळ रस्त्यावरील आंबेरी पुलावर पाणी आल्याने दुपारच्या सुमारास दीड तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून सुरु झालेल्या पावसाने दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारपासून पुन्हा कोसळण्यास सुरुवात केली आहे. माणगाव खोऱ्यातही दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. या पावसाच्या पाण्यामुळे कर्ली नदीपात्रातील पाण्यात वाढ झाल्याने पुलावर पाणी आले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पाणी पुलावर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली. माणगाव येथे गणेशोत्सवासाठी आलेले भाविक तसेच माणगावात जाणाऱ्या भाविकांना पुलावर पाणी आल्याने पाणी ओसरण्याची वाट पहावी लागली. नऊ दिवसाच्या गणेशांनाही विसर्जनासाठी नदीपात्रातील पाणी कमी होण्याची वाट बघावी लागली. माणगावात गणेशोत्सवाकरिता मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. सात दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर माघारी निघालेल्या भाविकांनाही पुलावर पाणी आल्याने पुलावरील पाणी कमी होईपर्यंत वाट पहावी लागली.
पुलावर पाणी आल्याने दीड तास वाहतुकीचा खोळंबा झाल्याने नागरिकांनाही या संततधार पावसाचा फटका सोसावा लागला. (प्रतिनिधी)