मध्यरात्रीपर्यंत जागून पुनर्विसर्जन
By Admin | Updated: October 1, 2015 00:28 IST2015-09-30T22:59:08+5:302015-10-01T00:28:48+5:30
मांडवी मित्रमंडळाचा उपक्रम : ओहोटीमुळे किनाऱ्यावर आलेल्या मूर्ती पुन्हा समुद्रात

मध्यरात्रीपर्यंत जागून पुनर्विसर्जन
रत्नागिरी : भरतीमुळे अनंत चतुर्दशीदिवशी समुद्रात विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती ओहोटीमुळे किनाऱ्यावर आल्या. मांडवीतील नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांना कळवले. शहर पोलीस निरीक्षक इंद्रजीत काटकर यांनी मांडवीतील तरूणांना गणेशमूर्ती विसर्जन करण्याची विनंती करताच मांडवी मित्र मंडळाच्या तरूणांनी पहाटे ३.३० ते ४ वाजेपर्यंत जागून किनाऱ्यावरील सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन केले.रविवारी (२७) दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत समुद्राला ओहोटी होती. सायंकाळी ७ पासून भरती सुरू झाली. रात्री १२ वाजेपर्यंत भरती असल्यामुळे किनाऱ्यापर्यंत समुद्राचे पाणी आले होते. त्यामुळे भाविकांनी किनाऱ्यालगतच गणपतींचे विसर्जन केले. त्यामध्ये छोट्या शाडूच्या मूर्तींपासून ४ ते ५ फूट प्लॅस्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती होत्या.
भरतीवेळी किनाऱ्यापर्यंत आलेले पाणी ओहोटीवेळी ५० फूट पुन्हा खाली जाते. त्यामुळे किनाऱ्यालगत विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती ओहोटीवेळी वाळूत किनाऱ्यालगत सापडल्या. ४ ते ५ फूटी मूर्ती १७ ते १८ तर छोट्या मूर्तींचाही यात समावेश होता.
मांडवीतील नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच पोलिसांना कळवण्यात आले. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इंद्रजीत काटकर यांनी मांडवी किनाऱ्यावर येऊन स्थानिक तरूणांना किनाऱ्यावरील मूर्ती पुन्हा विसर्जन करण्याचे आवाहन
केले.
त्यानुसार सुनील शिवलकर, परिमल मायनाक, रोहन मायनाक, विशाल शिवलकर, अमोल शिवलकर, अभय शिवलकर, सागर पावसकर, स्वप्नील नागवेकर, सूरज बावणे, सिध्देश शिवलकर, उमेश वारंग, रोहीत शिवलकर, अनिकेत पाटील, विशाल कीर, निशीकांत वारंग यांनी मध्यरात्री ३.३० ते ४ वाजेपर्यंत किनाऱ्यावरील सर्व गणेशमूर्तींचे समुद्रात विसर्जन केले.
भाविक गणेशमूर्ती विसर्जीत केल्यानंतर घरी जातात. मूर्ती विसर्जीत झाल्या आहेत किंवा नाही याबाबत ते फारसे जागरुक नसतात. मात्र, किनारपट्टीलगत राहणाऱ्या मंडळींना याबाबत दक्ष रहावे लागते. ज्यावेळी अशा प्रकारची बाब लक्षात येते त्यावेळी मात्र त्यांना पुढकार घ्यावा लागतो.
मध्यरात्रीपर्यंत काळोखात जागून गणेशमूर्ती विसर्जीत करण्याच्या मांडवी मित्र मंडळातील तरूणांच्या स्तुत्य उपक्रमांचे परिसरातून सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)