आता प्रतीक्षा रविवारच्या निकालाची
By Admin | Updated: October 16, 2014 22:50 IST2014-10-16T21:51:20+5:302014-10-16T22:50:16+5:30
मतमोजणी सकाळी ८ पासून : ६५ फेऱ्या, १३८ कर्मचारी नियुक्त

आता प्रतीक्षा रविवारच्या निकालाची
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया जरी पार पडली असली तरी आता साऱ्यांचेच लक्ष १९ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या निकालाकडे लागले आहे. तिन्ही विधानसभांची मतमोजणीही एकूण ६५ फेऱ्यांत होणार असून त्यासाठी १३८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येकी १५ टेबलवर मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी प्रत्यक्ष सकाळी ८ वाजल्यापासून प्रारंभ होणार आहे. रविवारी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यात विधानसभेसाठीचे मतदान शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडले. बुधवारी सायंकाळी ६ वाजता जिल्ह्यातील २४ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता प्रतीक्षा रविवारची लागली आहे. कणकवली मतदारसंघाची मतमोजणी कणकवली कॉलेज येथील एचपीसीएल सभागृहात, कुडाळची मतमोजणी सिंधुदुर्गनगरी येथील बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन येथे तर सावंतवाडी येथील मतमोजणी सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅडमिंटन सभागृहात होणार आहे. यासाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर मतदान यंत्रातील मतमोजणीसाठी १४ टेबल्स तर पोस्टल मतमोजणीच्या तपासणीसाठी एक टेबल अशाप्रकारे प्रत्येक मतमोजणीच्या ठिकाणी १५ टेबल असणार आहेत. या टेबलवर एक राजपत्रित अधिकारी, पर्यवेक्षक व मतमोजणी सहाय्यक असे तीन कर्मचारी प्रत्येक टेबलवर असणार आहेत. अशाप्रकारे एकूण १३८ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मतमोजणी ही ६५ फेऱ्यात होणार आहे. यामध्ये कणकवली- २३ फेऱ्यात, कुडाळ- २० तर सावंतवाडीची २२ फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. प्रत्येक फेरी १० ते १२ मिनिटांत पूर्ण होणार आहे.
दुपारपर्यंत निकाल लागणार
रविवारी सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. दुपारपर्यंत सर्व मतयंत्रातील मतमोजणी पूर्ण होऊन दुपारपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यानुसार कुडाळ मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया सकाळी ११.३० वाजेपर्यंत, कणकवली मतदारसंघाची दुपारी १२.३० पर्यंत तर सावंतवाडी मतदारसंघाची दुपारी १२.३० वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता
आहे. (प्रतिनिधी)
अशी होणार मतमोजणी
कणकवली मतदारसंघातील मतमोजणी अशी असेल- पहिल्यांदा देवगड तालुक्यातील विजयदुर्ग मतदान केंद्राच्या मतपेटीपासून मतमोजणीस सुरूवात होणार आहे. त्यानंतर वैभववाडी व कणकवली तालुक्यातील मतमोजणी टप्प्याटप्प्याने होणार आहे. कुडाळ मतदारसंघामध्ये पहिल्यांदा मालवण तालुक्यातील निरोम मतदान केंद्राच्या मतपेटीपासून मतमोजणीला प्रारंभ केला जाणार आहे. त्यानंतर कुडाळ तालुक्यात मतमोजणी होणार आहे. सावंतवाडी मतदारसंघातील मतमोजणीला सुरूवात वेंगुर्ले तालुक्यातील परूळे मतदान केंद्राच्या मतपेटीपासून सुरूवात होणार असून नंतर सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यांची मतमोजणी होणार आहे.