प्रतीक्षा स्मशानशेडच्या दुरूस्तीची
By Admin | Updated: August 5, 2014 00:20 IST2014-08-04T22:13:14+5:302014-08-05T00:20:08+5:30
रहिवाशांमध्ये नाराजी : निर्णय कधी होणार याकडे लक्ष

प्रतीक्षा स्मशानशेडच्या दुरूस्तीची
चिपळूण : तीन महिन्यांपूर्वी वादळी वाऱ्याने उद्ध्वस्त झालेली उक्ताड येथील स्मशानशेड दुरुस्त करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाला अद्याप वेळ मिळालेला नाही. एखादी दुर्दैवी घटना घडल्यास पत्र्याचा आधार घेऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली आहे. या साऱ्या प्रकाराबद्दल रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर असून, नगर परिषद कार्यालयावर प्रेतयात्रा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक ४ मध्ये अंदाजे ६ हजारांपर्यंत लोकसंख्या आहे. खेंड चौक, खेंड बडदेवाडी, उक्ताड कानसेवाडी आदी भागात एखादी व्यक्ती मृत झाल्यास तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी उक्ताड येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानशेड बांधण्यात आली आहे. मात्र, ७ मे रोजी झालेल्या चक्रीवादळाने ही शेड उद्ध्वस्त झाली आहे. यामुळे अंत्यसंस्काराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तत्कालीन नगराध्यक्ष रिहाना बिजले व अन्य सहकाऱ्यांनी या शेडची पाहणी करुन अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे. मात्र, तीन महिन्यांचा कालावधी झाला तरी नादुरुस्त शेड दुरुस्त करण्यात आली नसल्याने या परिसरातील रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. वारंवार सभेमध्ये चर्चा करुनही शेडचे काम लवकरच होईल, असे आश्वासन सत्ताधारी गटाकडून दिले जात आहे, अशी खंत शिवसेनेच्या नगरसेवक सुरेखा खेराडे यांनी व्यक्त केली आहे.
उक्ताड परिसरात शौचालयाचीही दुरवस्था आहे. याबाबत गेली दोन वर्षे महिलांनी आपली गाऱ्हाणे नगर प्रशासनाकडे मांडूनही अद्याप गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही.
नागरिकांना योग्य त्या सेवा सुविधा मिळाल्या पाहिजेत. मग तो कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहता सेवा देणे प्रशासनाचे काम असताना याकडे सत्ताधारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगर परिषद कार्यालयावर येत्या काही दिवसांत प्रेतयात्रा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नगरसेवक खेराडे यांनी दिला आहे. (वार्ताहर)