किल्ल्याला ‘अच्छे दिनां’ची प्रतीक्षा
By Admin | Updated: November 23, 2014 00:38 IST2014-11-23T00:37:42+5:302014-11-23T00:38:55+5:30
शिवछत्रपतींचे खरे स्मारक : उद्धव ठाकरेंच्या भेटीकडे लक्ष

किल्ल्याला ‘अच्छे दिनां’ची प्रतीक्षा
संदीप बोडवे ल्ल मालवण
मुंबईजवळील अरबी समुद्रात हजारो कोटी रूपये खर्च करून कथित शिवस्मारक उभारले जाणार आहे. दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील बीबीका मकबरा आणि दौलताबाद किल्ल्याला जागतिक वारसा घोषित करण्यासाठी पावले उचलली जात असतील तर छत्रपतींचे खरेखुरे स्मारक असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याला आता तरी अच्छे दिन येतील काय? असा प्रश्न शिवप्रेमींमधून उपस्थित होत आहे. रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार आहेत. ठाकरे यांच्या जिल्हा भेटीकडे जिल्ह्यातील शिवप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर जिल्हावासीयांचे आभार मानण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आले आहे. रविवारी ठाकरे सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देवून शिवछत्रपतींचे दर्शन घेणार आहेत. ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे किल्ल्यासंदर्भातील अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा केली जात आहे.
मुंबई जवळील अरबी समुद्रात शिवछत्रपतींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. मात्र, शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या वाट्याला नेहमीच उपेक्षा आली आहे. कृत्रिम शिवस्मारकासाठी शासनाने हजारो कोटी रूपये खर्च करण्याचा घाट घातला असतानाच दुसरीकडे शिवस्मारकाकडे राज्य शासनाने आतापर्यंत जाणूबुजून दुर्लक्ष केले आहे. साहजिकच अरबी समुद्रात शिवस्मारक बांधण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य शासनाचे कौतुक होत असताना ऐतिहासिक वारशाबद्दल उदासिन असल्याचा आरोपही जिल्हावासीयांकडून नेहमीच होत आहे.
शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाची साक्ष देणारा अभेद्य सिंधुदुर्ग किल्ला हा ऐतिहासिकदृष्ट्या कितीतरी महत्वाचा आहे. या किल्ल्याला आता साडेतिनशे वर्षे पूर्ण होणार आहेत. जिल्ह्यातील पर्यटनाचा मानबिंंदू म्हणून सिंधुदुर्ग किल्ल्याकडे संपूर्ण जग पाहत आहे.
बिबीका मकबरा आणि दौलताबाद किल्ल्याला जागतिक वारसा घोषित करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाकडून प्रयत्न करण्यात आले असतानाच ‘चौऱ्यांशी बंदरा ऐसा जागा, दुसरा नाही’ असे वर्णन केलेल्या शिवलंकेला चांगले दिवस यावेत. अशी अपेक्षा शिवप्रेमी करत आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराजांनी १६९५ साली स्थापन केलेले एकमेवाव्दितीय असे शिवछत्रपतींचे मंदिर आहे. हेच खरेखुरे छत्रपतींचे स्मारक आहे. या स्मारकाची जपणूक व्हावी, अशी मागणी शिवप्रेमींची आहे.
सिंधुदुर्ग किल्ला राष्ट्रीय स्मारक म्हणून गौरविला जावा. किल्ल्याची पडझड थांबवावी. मंदिर आणि ऐतिहासिक ठेव्यांचा जीर्णोद्धार व्हावा आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर प्रशस्त उद्यान बांधण्यात यावे. तसेच वृक्षलागवड करण्यात यावी. अशी शिवप्रेमींची इच्छा आहे.
४ एकीकडे संस्कृती व पर्यटनाचे प्रतिक असलेला सिंधुदुर्ग किल्ला आता शासनाकडून दुर्लक्षित होणे हे दुर्दैवी आहे. ढासळत चाललेले बुरूज, पडझड झालेली तटबंदी, वैराण माळरान, जीर्ण झालेले ऐतिहासिक ठेवे, मंदिराची दुरवस्था, सोयी सुविधांचा अभाव, प्लास्टिक प्रदूषणाचा विळखा यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याचे बकाल चित्र पर्यटकांमार्फत जगासमोर जात आहे.