तळवणे-वेळवेवाडी पुलाची प्रतीक्षा!

By Admin | Updated: July 9, 2015 00:13 IST2015-07-09T00:13:45+5:302015-07-09T00:13:45+5:30

लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष : दोन खांबांवरच काम जैसे थे

Waiting for the fist-time-wreck bridge! | तळवणे-वेळवेवाडी पुलाची प्रतीक्षा!

तळवणे-वेळवेवाडी पुलाची प्रतीक्षा!

सुनील गोवेकर - आरोंदा -रेडी-रेवस महामार्गाला जोडणाऱ्या तळवणे-वेळवेवाडी पुलाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याची घोषणा हवेत विरली असून, पुलाचे बांधकाम अपूर्णावस्थेतच आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याने अधिकारीही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे हा पूल होणार तरी के व्हा, असा प्रश्न संतप्त ग्रामस्थांतून विचारला जात आहे.
२८ वर्षांपासून तळवणे, सातार्डा, कवठणी, किनळे, नयबाग कवठणी परिसरातील या गावांच्या दृष्टीने अती महत्त्वाचा असणाऱ्या तळवणे-वेळवेवाडी पुलाची मागणी करण्यात येत होती. सर्वप्रथम भाईसाहेब सावंत यांच्या कारकिर्दीत या पुलाची मागणी करण्यात आली. त्यानंतर प्रवीण भोसले पालकमंत्री असताना या पुलाच्या मागणीचा पाठपुरावा करण्यात आला. ग्रामस्थांची होणारी अडचण पाहून अखेर या पुलाला हिरवा कंदील मिळाला. हा पूल रेडी-रेवस माहामार्गावर उभारल्याने अनेक गावांना याचा फायदा होणार असल्याने याबाबत पंचक्रोशीतून समाधान व्यक्त करण्यात आले. पुलाची जबाबदारी तत्कालीन लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी घेतली. पण त्यामध्ये सातत्य राहिले नाही. त्यामुळे ग्रामस्थांत नाराजी पसरली. यातूनच शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी १९९४ मध्ये तळवणे पूल कृती समितीची स्थापना करण्यात आली. समितीचे अध्यक्ष म्हणून गुरुदास बर्वे यांची निवड करण्यात आली.
समितीच्या रेट्याने १९९४-९५ या कालावधीच्या अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन मंत्री नितीन गडकरी यांनी पुलाला मंजुरी दिली व पुलाच्या कामाला वेग आला. या पुलाचे अंदाजपत्रक ३३ मीटर पूल व ५८४ मीटर जोडरस्ता असे धरून ३ कोटी ६५ लाखाचे करण्यात आले. याला मान्यता मिळून तत्कालीन बांधकामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन पुलाचे काम सुरू करण्यात आले. त्यावेळी हा पूल एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु फेब्रुवारीपर्यंत कामाला काहीच गती मिळाली नसल्याने कृती समितीने पूल लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषणाचे निवेदन दिले. त्यामध्ये त्यानंतर कृती समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, शेतकरी व बांधकाम खात्याचे अधिकारी व शाखा अभियंता यांची बैठक तळवणे ग्रामपंचायत येथे घेऊन कार्यकारी अभियंता यांनी पुलाचे काम मे महिन्याअखेरीपर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले. त्यावेळी कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.


लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज
दरम्यान, शेतकऱ्यांनी या पुलासाठी संपादीत केलेल्या जमिनीची व जमिनीतील संपत्तीची रास्त मुल्यानुसार नुकसान भरपाई मिळेपर्यंत काम सुरू न करण्याचे निवेदन ३ जून रोजी दिले आहे. त्यामुळे या कामाला गती मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज आहे.
कृती समितीची खंत
वेळवेवाडी पूल कृती समिती याकामासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत आहे. मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे मत कृती समिती अध्यक्ष गुरूदास बर्वे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचेही सांगितले.


दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी महारॅली
सध्या पावसाळा सुरू झाला, तरी अजूनही पुलाच्या कामाची स्थिती केवळ दोन खाबांवरतीच थांबून आहे. तर यामध्ये टाकण्यात आलेला भरावही अर्धवटच टाकण्यात आला असून भरावाला कसलेही पिचींग करण्यात आले नाही.
त्यामुळे हा भराव केवळ देखाव्यासाठी टाकला आहे की कसा? असा प्रश्न निर्माण झाला होता. यावरही कृती समितीने विचारणा केल्यावर हा भराव कच्चा असून यावर पक्का भराव करण्याचे आश्वासन कंत्राटदारामार्फत देण्यात आले.
पण हे आश्वासन केवळ तोंडीच राहिले. आजपर्यंत आहे त्या स्थितीतच आहे. काळेथर दगडाचे १०-१० डंंपर भरावावर टाकण्यात आलेले आहेत. मात्र, त्यातून काही झालेच नाही.
तर किनळे-वेळवेवाडीकडे जाणाऱ्यांना चिखलाच्या दलदलीतून रहदारी करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. हा पूल झाला तर पंचक्रोशीला लाभ होणार आहे

Web Title: Waiting for the fist-time-wreck bridge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.