रोजंदारी कर्मचारी वाऱ्यावर

By Admin | Updated: July 4, 2015 00:01 IST2015-07-03T23:05:01+5:302015-07-04T00:01:05+5:30

कृषी विद्यापीठाची स्थिती : महसूलमंत्र्यांचे आश्वासन हवेतच

The wages of the wage worker | रोजंदारी कर्मचारी वाऱ्यावर

रोजंदारी कर्मचारी वाऱ्यावर

शिवाजी गोरे- दापोली -महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या आश्वासनाला पाच महिने उलटले तरी राज्यातील तीन कृषी विद्यापीठांतील १,१५१ रोजंदारीवरील मजूर, तसेच कुशल-अर्धकुशल कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजूनही पडूनच आहे. या मजुरांना सेवेत कायम करण्यात येईल, अशी घोषणा खडसे यांनी पाच महिन्यांपूर्वी केली होती. मात्र, तसे कोणतेही आदेश अजूनही आलेले नाहीत.
राज्यातील तीनही कृषी विद्यापीठांत रोजंदारीवरील मजूर तुटपुंजा मजुरीवर गेली २० ते २५ वर्षे काम करीत आहेत. अशा रोजंदार मजुरांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी गेली अनेक वर्षे मजूर करत आहेत. दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. किसन लवांडे यांनी राज्यपाल व तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर सरकारही बदलले. त्यामुळे हे घोंगडे पुन्हा भिजत पडले. युतीचे सरकार सत्तेत आल्यावर या विषयाला वाचा फोडण्यात आली. विधान परिषदेचे आमदार रामनाथ मोते, दापोलीचे आमदार संजय कदम यांनी हा मुद्दा लावून धरला. मोते यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खडसे यांनी या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सामावून घेण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यासाठी ५९६ अधिसंख्य पदे मंजूर करण्यात येणार आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या वेतन व भत्त्यासाठी दरवर्षी सहा कोटी ४० लाख रुपयांच्या अतिरिक्त खर्चासही मंजुरी देण्यात आली आहे.

रोजंदारी मजुरांना सेवेत कायम करण्याची घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यानंतरही शासन स्तरावर कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. गेली २० ते २५ वर्षे विद्यापीठाची सेवा करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सरकारने कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचे आदेश त्या त्या विद्यापीठाला द्यावेत; अन्यथा येत्या पावसाळी अधिवेशनात रोजंदारी कर्मचाऱ्यांचा मुद्दा पुन्हा उपस्थित करून महसूलमंत्र्यांना रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यास भाग पाडू. - संजय कदम, आमदार दापोली.


कायम करण्यात येणाऱ्या या १,१५९ पदांमध्ये कृषी विद्यापीठनिहाय रोजंदारी मजूर, कुशल-अकुशल कर्मचारी यांची संख्या अनुक्रमे अशी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,
परभणी : २८३ मजूर, २६३ कुशल-अर्धकुशल कर्मचारी
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,
अकोला : २५३ मजूर, कुशल-अर्धकुशल ३१,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,
दापोली : २३५ रोजंदारी मजूर

Web Title: The wages of the wage worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.