सर्वत्र शांततेत मतदान : लोकसभेच्या तुलनेने टक्केवारी घसरली

By Admin | Updated: October 16, 2014 00:07 IST2014-10-15T23:37:04+5:302014-10-16T00:07:16+5:30

कायदा सुव्यवस्था अबाधित! प्रचारप्रमुखाची यशस्वी जबाबदारी पार पाडली : राणे

Voting in peace everywhere: The percentage of Lok Sabha has dropped | सर्वत्र शांततेत मतदान : लोकसभेच्या तुलनेने टक्केवारी घसरली

सर्वत्र शांततेत मतदान : लोकसभेच्या तुलनेने टक्केवारी घसरली

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. तिन्ही मतदारसंघात नियुक्त निवडणुकीच्या अधिकाऱ्यांनी तसेच सुरक्षा यंत्रणेने चोख कामगिरी बजावत राडे संस्कृतीला पूर्णविराम दिला. आघाडी आणि युतीच्या फाटाफुटीनेही प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आपल्या उमेदवाराच्या मतदानात वाढ करण्याकडेच लक्ष दिले. त्यामुळे अनुचित प्रकार टळले. विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०१४ च्या अनुषंगाने बुधवार १५ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान पार पडले आहे. जिल्ह्यात मतदानादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडला नसून सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तिन्ही मतदारसंघातून प्राप्त माहितीनुसार सरासरी ५६ टक्के मतदान झाले असून सायंकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल रात्री उशिरा प्राप्त होणार असल्याने जिल्ह्यात अंदाजे सरासरी मतदानाची टक्केवारी ६५ टक्केपर्यंत होईल, असा अंदाज जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मतदानाच्या दिवशी माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी ई. रविंद्रन बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अभय करगुटकर यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी ई. रविंद्रन म्हणाले, जिल्ह्यात आज सर्वत्र शांततेत मतदान पार पडले आहे. तिन्ही मतदारसंघांसाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक यंत्रणेने अतिशय चोख व्यवस्था पार पाडली. २६८ कणकवलीमध्ये २ लाख २३ हजार ९१० मतदार असून सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत १ लाख ३४ हजार ३९२ मतदारांनी मतदान केले. मतदानाची सरासरी टक्केवारी ६०.०२ टक्के आहे. २६९ कुडाळमध्ये २ लाख ४ हजार ८०५ मतदार असून एकूण ५८.१७ टक्के, २७० सावंतवाडीमध्ये २ लाख १९ हजार ३८ मतदार यापैकी १ लाख १२ हजार ४३१ मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी ५१.३३ आहे. एकूण तिन्ही मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी ६५ टक्के होईल असा अंदाज जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी व्यक्त केला.

प्रचारप्रमुखाची यशस्वी जबाबदारी पार पाडली : राणे
कणकवली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोठ्या विश्वासाने प्रचारप्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपविली होती. प्रचार प्रमुख म्हणून मी जे मुद्दे उपस्थित केले तेच मुद्दे सर्व पक्षांच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिले. हेच आपले यश आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी कणकवली तालुक्यातील वरवडे फणसवाडी येथील मतदानकेंद्रावर मतदान केल्यानंतर व्यक्त केले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत राज्यात पंचरंगी लढती झाल्या. त्याचा फायदा काँग्रेसलाच होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही जागांवर काँग्रेसच विजयी होईल.
नीतेश राणे यांना मतदान करताना आपल्या काय भावना आहेत, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मतदान करून मी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे. त्याशिवाय वडिलांचे कर्तव्यही पार पाडले आहे. नीतेश राणे या निवडणुकीत विजयी होऊन एक आदर्श आमदार म्हणून काम करतील, असा विश्वासही राणे यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा आपल्याला विश्वास आहे, असेही नारायण राणे म्हणाले. (वार्ताहर)

Web Title: Voting in peace everywhere: The percentage of Lok Sabha has dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.