उपरकरांना मतदार जागा दाखवतील : दळवी
By Admin | Updated: July 20, 2014 22:14 IST2014-07-20T22:05:00+5:302014-07-20T22:14:46+5:30
माजी सभापती

उपरकरांना मतदार जागा दाखवतील : दळवी
सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर यांचे मताधिक्य घटविण्यासाठीच परशुराम उपरकर सावंतवाडीतून विधानसभेची निवडणूक लढविण्याचा मनसुबा बाळगून आहेत. उपरकरांची स्वत:ची अनामत रक्कम वाचविण्याची कुवत नाही. त्यामुळे मतदारच त्यांना त्यांची जागा दाखवतील, अशी टीका पंचायत समितीचे माजी सभापती अशोक दळवी यांनी केली आहे.
उपरकर यांनी केसरकर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत त्यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना पत्रकात दळवी यांनी म्हटले आहे की, परशुराम उपरकर यांनी शिवसेनेत राहून नारायण राणे यांच्या हिताचेच निर्णय घेतले होते. त्यांच्याच हेकेखोरपणामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ वगळता अन्यत्र शिवसेना-भाजप व राष्ट्रवादीची युती जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत झाली नव्हती. आता ते काँग्रेसचे राणे यांच्या इच्छेनुसार काम करीत असून केसरकर यांचे मताधिक्य घटविण्यासाठीच सावंतवाडीतून विधानसभेची निवडणूक लढविण्याचा मनसुबा बाळगून आहेत. मात्र, मतदार त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यासाठी कर्तबगारी दाखवून उपरकर यांना त्यांची जागा दाखवतील, असे पत्रकात म्हटले आहे.
केसरकर यांनी गर्भश्रीमंत घरातच जन्म घेतला. त्यामुळे त्यांना मंत्री होऊन स्वत:चे घर चालविण्याची गरज नाही. आमदार झाल्यानंतर राज्यातील मतदार श्रीमंतीकडे घोडदौड करीत असताना केसरकर यांच्या संपत्तीत मात्र घट झाल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्यावर मंत्रिपदासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याचा आरोप करणाऱ्या उपरकर यांनी स्वत:ची काळजी करावी, असा टोलाही अशोक दळवी
यांनी प्रसिद्धीपत्रकातून हाणला
आहे. (वार्ताहर)