कॅम्पस अॅम्बिसिडरनी मतदार - जागृती करावी : जिल्हाधिकारी
By Admin | Updated: September 25, 2014 23:31 IST2014-09-25T21:14:30+5:302014-09-25T23:31:19+5:30
जिल्ह्याचे नाव देशात मोठे करा -ई. रविंद्रन : मतदारांना केले आवाहन

कॅम्पस अॅम्बिसिडरनी मतदार - जागृती करावी : जिल्हाधिकारी
सिंधुदुर्गनगरी : विधानसभा २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील २७ महाविद्यालयांमध्ये तालुकानिहाय कॅम्पस अॅम्बिसिडर जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेले आहेत. या कॅम्पस अॅम्बिसिडरनी मतदार जागृतीसाठी आपले महाविद्यालय, आपले गाव, आपला परिसर या ठिकाणी मतदार जागृती उत्स्फूर्तपणे करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४च्या अनुषंगाने महाविद्यालयीन विद्यार्थी, कॅम्पस अॅम्बिसिडरना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी ई. रविंद्रन बोलत होते. यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक चाँद बादशहा, निवडणूक उपजिल्हाधिकारी अभय करगुटकर व तालुकानिहाय २३ महाविद्यालयाचे कॅम्पस ब्रॅण्ड अॅम्बिसिडर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी ई. रविंद्रन म्हणाले, कॅम्पस अॅम्बिसिडरनी विधानसभा २०१४ निवडणूक कालावधीत मतदान करण्यासाठी जनतेला आवाहन करावे. कॅम्पस अॅम्बिसिडरनी जिल्ह्यात शंभर टक्के मतदानासाठी प्रत्येक मतदार संघनिहाय प्रयत्न करण्यासाठी संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून कार्यक्रमांचे आयोजन करावे. प्रशासनातर्फे प्रत्येक कुटुंबनिहाय व्होटर स्लीप वाटण्यात येत आहे. त्यावेळी कॅम्पस अॅम्बिसिडरनीही वाडीवार जनजागृती करावी. आपल्या मतदार यादीत नाव आहे का हे सर्वांनी तपासून घ्यावे. आपल्या कुटुंबाला, आपल्या शेजारी, गाव, वाडी व महाविद्यालयात ज्यांच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत त्या सर्वांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्याचे काम कॅम्पस अॅम्बिसिडरनी करावे. प्रशासनाकडून कॅम्पस अॅम्बिसिडरना लागणारी मदत करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
निवडणूक खर्च निरीक्षक चाँद बादशहा म्हणाले, कॅम्पस अॅम्बिसिडर हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. या कॅम्पस अॅम्बिसिडरमध्ये आत्मविश्वास दिसून येत आहे. तो आत्मविश्वास मतदार जागृती कार्यक्रमातही असाच ठेवावा. विद्यार्थ्यांनी उत्साह व नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून प्रशासनाच्या सहकार्याने मतदार जागृतीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन बादशहा यांनी केले.उपजिल्हाधिकारी करगुटकर म्हणाले, अॅम्बिसिडरना प्रशासनाकडून मतदार जागृती प्रचार कार्यासाठी लागणारी मदत करण्यात येईल. प्रत्येक महाविद्यालयात मतदार यंत्राद्वारे कसे मतदान केले जाते याचे प्रात्यक्षिक स्थानिक प्रशासनाच्या मदतीने दाखविण्यात येईल. कॅम्पस अॅम्बिसिडरनी या कार्यक्रमासाठी महाविद्यालयात जनजागृती करावी, असे आवाहन करगुटकर यांनी केले.प्रत्येक महाविद्यालयातील कॅम्पस अॅम्बिसिडरनी यापूर्वी राबविलेले उपक्रम व सध्या राबविण्यात येणारे उपक्रम यांची माहिती यावेळी बैठकीत सादर केली. गाव भेटी, तोंडी प्रचार, गावफेऱ्या, पथनाट्य या उपक्रमांद्वारे मतदार जागृतीसाठी प्रशासनाच्या सहकार्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
जिल्ह्याचे नाव देशात मोठे करा
ई. रविंद्रन : मतदारांना केले आवाहन
कुडाळ : आपल्या जिल्ह्याचे नाव देशात मोेठे होऊन सिंधुदुर्गची शान वाढण्याकरिता जिल्ह्यातील मतदारांनी १०० टक्के मतदान या निवडणुकीत करावे, असे आवाहन मतदान जनजागृतीचे निरीक्षक रतन प्रकाश व जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी कुडाळ येथील मतदान जनजागृती कार्यक्रमात केले.
विधानसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान व्हावे, याकरिता मतदार राजा जागृत होण्यासाठी शासनाच्यावतीने मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यात केले असून कुडाळ ग्रामपंचायत समोर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी निरीक्षक रतन प्रकाश, जिल्हाधिकारी ई. रविंद्रन, कुडाळचे प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, तहसीलदार जयराज देशमुख, मालवण तहसीलदार वनिता पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रविंद्रन म्हणाले, देशाच्या व लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी १०० टक्के मतदान होणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या परिसरातील सर्वांना १५ आॅक्टोबर रोजी मतदान करण्याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन ई. रविंद्रन यांनी यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना केले.
यावेळी सर्वांनी शपथ ग्रहण केली. तसेच कर्मचाऱ्यांनी मतदान यंत्राच्या वापराविषयी सर्वांना माहिती दिली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. जिल्ह्यात बहुतांशी भागात आता जनजागृती कार्यक्रम प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)