समुद्रात वावटळीचे तांडव
By Admin | Updated: September 12, 2014 23:51 IST2014-09-12T23:47:54+5:302014-09-12T23:51:29+5:30
विध्वंस टळला : पाण्याचा उभा स्तंभ

समुद्रात वावटळीचे तांडव
मालवण : मालवण चिवला बीच येथील दहा वाव समुद्रात शुक्रवारी सायंकाळी समुद्री वावटळीचा थरार स्थानिक मच्छिमारांना अनुभवास मिळाला. एका क्रिकेटच्या मैदानाएवढी या वावटळीची व्याप्ती होती. वावटळीच्या वाऱ्यामुळे समुद्राच्या पाण्याचा उभा स्तंभ आकाशापर्यंत पोहोचला होता. पाणी आणि वाऱ्याचे तांडव तब्बल ७ मिनिटे सुरू होते. ही वावटळ किनाऱ्यापर्यंत आली असती तर मोठा विध्वंस घडला असता, असे स्थानिकांनी सांगितले.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, शुक्रवारी सायंकाळी चिवला बीच किनाऱ्यावर पारंपरिक मच्छिमार होड्यांची डागडुजी करीत असताना ६.३०च्या सुमारास अचानक काळोख दाटून आला. याचवेळी समुद्रात चक्राकार वाऱ्याची वावटळ तयार होत असल्याचे मच्छिमारांच्या निदर्शनास आले. क्षणार्धात वावटळीने रौद्ररूप धारण केले. वाऱ्याच्या भोवऱ्यामुळे समुद्राच्या पाण्याचा स्तंभ तयार झाला होता. हा स्तंभ आकाशापर्यंत उंच गेला होता.अशा प्रकारची समुद्री वावटळ पहिल्यांदाच अनुभवास मिळाली. ही वावटळ भयंकर अशीच होती. वावटळीचे तांडव किनाऱ्यापर्यंत आले असते, तर किनाऱ्यावर मोठा विध्वंस घडला असता, असे स्थानिक मच्छिमार भाई कासवकर म्हणाले. (प्रतिनिधी)