विनायक राऊत यांचा विजय
By Admin | Updated: May 17, 2014 00:07 IST2014-05-16T23:55:06+5:302014-05-17T00:07:03+5:30
रत्नागिरी : सर्वपक्षीय विरोधातून तयार झालेल्या वातावरणाचा मोठा फटका रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान खासदार नीलेश राणे यांना बसला.

विनायक राऊत यांचा विजय
रत्नागिरी : सर्वपक्षीय विरोधातून तयार झालेल्या वातावरणाचा मोठा फटका रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान खासदार नीलेश राणे यांना बसला. महायुतीच्या विनायक राऊत यांनी त्यांचा तब्बल १ लाख ५० हजार ५१ मतांनी पराभव केला. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला आहे. केवळ रत्नागिरीच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातूनही राऊत यांनाच मताधिक्य मिळाले. रायगड मतदारसंघात शिवसेनेचे अंनत गीते यांनी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा अवघ्या २,२१० मतांनी पराभव केला. गीते यांना ३,९६,०६५ मते मिळाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत विनायक राऊत यांनी सात हजाराची आघाडी मिळवली आणि हाच सर्वांसाठी धक्का होता. मतमोजणीसाठी आलेले नीलेश राणे या फेरीनंतर केंद्रातून निघून गेले. तेव्हापासून सुरू झालेली मताधिक्याची मालिका शेवटच्या फेरीपर्यंत तशीच सुरू राहिली. मोजणीच्या तब्बल २५ फेर्या झाल्या. विधानसभानिहाय मतांचा विचार केला तर राऊत यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले सावंतवाडी मतदारसंघात. येथे नीलेश राणेंपेक्षा त्यांना ४१ हजार मतांची आघाडी मिळाली. त्याखालोखाल मताधिक्य मिळाले ते रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात. राऊत यांना येथे ३१ हजार ५६५ आणि चिपळूण मतदारसंघात ३१ हजार १४० मतांची आघाडी मिळाली. राजापूर मतदारसंघात राऊत यांनी २२ हजार ३१५ मतांची आघाडी घेतली. नारायण राणे ज्या विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत, त्या कुडाळ-मालवण मतदारसंघातही राऊत यांना २१ हजार ८८३ मतांची आघाडी मिळाली.काँग्रेसला किंबहुना नारायण राणे यांना मोठी आशा कणकवली-देवगड मतदारसंघावर होती. इतर ठिकाणी कमी होणारी मते कणकवलीतून मिळणार्या मोठ्या आघाडीतून भरून काढण्याचा अंदाज बांधला जात होता, पण प्रत्यक्षात येथेही विनायक राऊत यांना १,३७७ मतांची आघाडी मिळाली. पोस्टल मतांसह राऊत यांना ४ लाख ९३,०८८, तर नीलेश राणे यांना ३ लाख ४३,०३७ इतकी मते मिळाली. राऊत १, ५०,०५१ मतांनी विजयी झाले. (प्रतिनिधी)