सावर्डे परिसरातील गावे १८ दिवस अंधारात
By Admin | Updated: October 12, 2014 23:30 IST2014-10-12T23:25:18+5:302014-10-12T23:30:20+5:30
दिव्याखाली अंधार : महावितरणच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांचा एकमेकांकडे अंगुलीनिर्देश

सावर्डे परिसरातील गावे १८ दिवस अंधारात
चिपळूण : तालुक्यातील सावर्डे परिसरातील गावे २४ सप्टेंबरपासून आजतागायत म्हणजेच १८ दिवस अंधारात आहेत. याबाबत महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी परस्परांकडे बोट दाखवत असून, कंपनीच्या या अनागोंदी कारभाराला ग्रामस्थ वैतागले आहेत.
शनिवार (दि.११) पासून तात्पुरत्या स्वरुपात शेजारच्या गावातून वीज पुरवण्यात आली आहे. मात्र ती सुद्धा वारंवार खंडीत होत असल्याने ग्राहक बेजार झाले आहेत. महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता ‘ट्रायल चालू आहे’, ‘काम चालू आहे’ अशी थातूर मातूर उत्तरे दिली जात आहेत.
दि. २४ सप्टेंबर रोजी सावर्डे परिसरातील पिलवली तर्फ सावर्डे, वीर आदी भागातील वीजपुरवठा खंडित झाला. या दिवशी परिसरात तुफानी पाऊस झाला होता. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे वीज खंडित झाली असेल, असे समजून ग्रामस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, दोन दिवस झाले तरी परिसर अंधारातच होता. याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही सांगण्यात आले. त्यांनी संबंधित वायरमनकडे संपर्क साधण्यास सांगितले. मात्र, वायरमनने ही बाब अधिकाऱ्यांनाच सांगावी, असे सांगून हात वर केले. त्यामुळे वीज गायब असल्याची तक्रार नेमकी कोणाकडे करावी, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला.
कोजागिरी पौर्णिमेपर्यंत या गावातील वीजप्रवाह खंडित होता. पौर्णिमेला या गावांमधील वीजप्रवाह सुरू झाला. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा तो खंडित झाला. विशेष म्हणजे परिसरात या दिवशी पावसाचा एक थेंबही पडला नव्हता, असे ग्रामस्थांनी सांगितले.याबाबत ग्रामस्थांनी महावितरणकडे कळवले.
कार्यालयाकडे संपर्क साधला असता वादळामुळे वीज गेल्याचे सांगितले जाते. मात्र, अलिकडे वादळच झाले नाही, तेथे इतके दिवस वादळामुळे वीज गायब कशी होऊ शकते? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. या परिसरातील गायब झालेली वीज सुरू करण्याची मागणी होत असताना त्याकडे दुर्लक्ष का असा प्रश्न विचारला जात आहे. (प्रतिनिधी)
अनेक समस्या...
इतके दिवस वीज गायब असल्याने गावात अनेक समस्या उद्भवत आहेत. सध्या गावात पाणी असूनही दूरवरून पाणी आणावे लागत आहे. मोबाईल बॅटरी चार्ज नसल्याने रेंज आहे, पण चार्जिंग नाही, असे म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे.
वादळ आले तरी कुठे?
वादळ आल्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली. त्यामुळे वीज गायब असल्याचे महावितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी सांगत आहेत. मात्र, या परिसरात वादळ केवळ एकदाच आले होते आणि ती वीज सुरू करण्यास एवढा वेळ लागतो का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.