ग्रामस्थांनी रस्ता काम रोखले
By Admin | Updated: February 27, 2015 23:21 IST2015-02-27T22:46:53+5:302015-02-27T23:21:23+5:30
चौकशीचे आदेश : सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर काढला तोडगा

ग्रामस्थांनी रस्ता काम रोखले
तळेरे : मुंबई-गोवा महामार्ग ते कासार्डे फोंडा रस्त्याला जोडणाऱ्या मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे हे समजताच कासार्डे ग्रामस्थांनी या रस्त्यांचे काम थांबवत या निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांना गुरुवारी जाब विचारत कामाविषयी चौकशी करण्याचे आदेश दिले. यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत काम चांगले करण्याची ग्वाही देत तोडगा काढला.मुंबई-गोवा महामार्गापासून ते कासार्डे पियाळी- फोंडा रस्त्याला जोडणाऱ्या मार्गाचे काम पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून काही वर्षांपूर्वी झाले. याच रस्त्याने मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक झाल्याने हा रस्ता पूर्णपणे खराब झाला होता. यावेळी या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी १३व्या वित्त आयोगानुसार या रस्त्याचे काम सुरू होते. अंदाजे २३ लाख ९४ हजार ८७९ रकमेचे अंदाजपत्रक असलेले या रस्त्याचे काम सुशील लोके यांच्या ओमटेक असोसिएट कंपनीला काम करण्यास दिले. यावेळी हे काम सुरू होण्यापूर्वी स्थानिक प्रशासन असणाऱ्या ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता काम सुरू केले. यावेळी या कामाचे सुरूवातीला काम चांगले करण्यात आले. मात्र, त्यानंतर काही थोडेसे डांबर व मोठ्या दगडांचा वापर करीत पुढील काम सुरू करण्यात आले. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, असे समजताच बुधवारी कासार्डे ग्रामस्थांनी धाव घेत या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता तुषार बुरूड, सहाय्यक कार्यकारी अभियंता पी. एस. माळगावकर यांनी गुरूवारी घटनास्थळी भेट देत कामाची पाहणी केली. हे काम निकृष्ट आहे असे ग्रामस्थांनी सांगितल्यानंतर या कामाची पाहणी केली व काम निकृष्ट झाल्याची कबुली दिली. यानंतर जे काम झाले आहे ते पूर्णपणे काढून नवीन दर्जेदार काम करा, असे त्यांनी येथे कामावर असलेले कनिष्ठ स्थापत्य अभियंता पी. पी. पारकर, सहाय्यक स्थापत्य अभियंता एस. पी. कांबळी व ठेकेदार सुशील लोके यांना काम पूर्ण करून देण्याचे व कामाचा दर्जा उत्कृष्ट राखण्याचे आदेश दिले. यावेळी कासार्डे सरपंच संतोष पारकर, सुधाकर रावले, सहदेव खाडये, राकेश मुणगेकर, राकेश वालावलकर, रूपेश कानसे, निखिल पिसे, विद्याधर नकाशे, अनंत सटवकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. हे काम दर्जेदार न झाल्याने काम बंद पाडले जाईल, असे सांगत हे काम दर्जेदार करावे, अशी ग्रामस्थांनी मागणी केली
आहे. (वार्ताहर)