Vidhan Sabha 2019: कुडाळ-मालवणमध्ये रंगतदार लढत; वैभव नाईकांच्या विजयात बंडखोर ठरणार का अडसर ?

By वैभव देसाई | Published: October 7, 2019 05:41 AM2019-10-07T05:41:41+5:302019-10-07T05:53:15+5:30

2014ला कुडाळ-मालवण मतदारसंघातून शिवसेनेचे वैभव नाईक नारायण राणेंचा पराभव करत 10,500 मतांनी विजयी झाले होते.

Vidhan Sabha 2019: fight in Kudal-Malvan; Why is it difficult to be a rebel in the victory of glory heroes? | Vidhan Sabha 2019: कुडाळ-मालवणमध्ये रंगतदार लढत; वैभव नाईकांच्या विजयात बंडखोर ठरणार का अडसर ?

Vidhan Sabha 2019: कुडाळ-मालवणमध्ये रंगतदार लढत; वैभव नाईकांच्या विजयात बंडखोर ठरणार का अडसर ?

Next

- वैभव देसाई

गेल्या काही दिवसांपासून तळ कोकणातल्या राजकारणात वेगळ्याच उलथापालथी होत आहेत. कोण कोणाविरोधात कधी उभं राहतंय, याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. पण आता हळूहळू चित्र स्पष्ट होताना दिसतंय. भाजपाला राणेंची ताकद मिळाल्यानं साहजिकच स्वाभिमान संघटनेच्या तळागाळातील कार्यकर्त्यांसह कोकणातील भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, एक वेगळंच बळ मिळालेलं आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघात राणेंचं संघटन बऱ्यापैकी विस्तारलेलं आहे. अनेक ग्रामपंचायती त्यांच्या ताब्यात आहेत.

2014ला कुडाळ-मालवण मतदारसंघातून शिवसेनेचे वैभव नाईक नारायण राणेंचा पराभव करत 10,500 मतांनी विजयी झाले होते. त्यावेळी या मतदारसंघात चौरंगी लढत होती. तेव्हा शिवसेनेच्या वैभव नाईकांना 71 हजार मते पडली होती, तर काँग्रेसकडून लढणाऱ्या नारायण राणेंनी 60,500 एवढं मताधिक्य मिळवलं होतं. भाजपाच्या बाब मोंडकर यांना 4500 मते आणि राष्ट्रवादीच्या पुष्पसेन सावंत यांना 2500 एवढी मते पडली होती. 2014ला नारायण राणेंचा पराभव करून वैभव नाईक राज्यात जाएंट किलर ठरले होते. परंतु तेव्हाची परिस्थिती आता राहिलेली नाही. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे.

वैभव नाईकांची कुडाळ-मालवणमध्ये जनतेत पहिल्याएवढी लोकप्रियता राहिलेली नाही, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कुडाळ-मालवणमध्ये जनतेशी निगडीत असलेल्या पाण्याचा प्रश्न असो, किंवा रस्त्यांची कामं प्रलंबित असल्यानं मतदारसंघात काहीशी त्यांच्याबद्दल नाराजी आहे. राणेंनी कोकणात भाजपाला बळ दिल्यानं एकंदरीत वैभव नाईकांच्या मार्गात अनेक अडथळे येण्याची शक्यता आहे.

भाजपाच्या जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनी वैभव नाईकांचा प्रचार करण्यास नकार दिल्याचं सांगितलं जातंय. राणेंचे समर्थक आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते दत्ता सामंत यांनी वैभव नाईकांविरोधात उमेदवारी अर्ज भरला होता. त्यावेळीच ते वैभव नाईकांसमोर मोठं आव्हान उभं करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु नाईकांनी सामंतांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्यानंतर तो बाद ठरवण्यात आला. आता नारायण राणे वैभव नाईकांविरोधात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर किंवा भाजपा नेते रणजित देसाई यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोरांना त्यांची उमेदवारी मागे घेतली नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. असे असूनही दोन्ही पक्षातील बंडखोरांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी मंचावर बोलवल्यास मी शिवसेनेच्या उमेदवाराचाही प्रचार करेन, असंही राणे म्हणाले होते. त्यामुळे एकंदरीतच राणेंच्या राजकारणाचा अंदाज लावलं कठीण आहे. वैभव नाईक यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसेल, असे सूतोवाच नारायण राणेंनी केले आहेत. तसेच यंदा राणे आणि भाजपा एकत्र आल्यानं गेल्या निवडणुकीत वैभव नाईकांना मिळालेलं 10,500 एवढं मताधिक्य तोडणं फारसं अवघड नाही.

याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या मालवण येथील निवासस्थानी दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक झाल्याचीही चर्चा आहे. कुडाळ- मालवणमधून आम्ही माघार घेतलेली नाही. भाजप नेतृत्वाशी चर्चा करून उमेदवार दिला जाईल, असेही राणेंनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे कुडाळ-मालवणमधून नारायण राणे रणजित देसाई की अतुल काळसेकर यांना वैभव नाईकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवतात की त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगतात हे काही वेळातच समजणार आहे.

Web Title: Vidhan Sabha 2019: fight in Kudal-Malvan; Why is it difficult to be a rebel in the victory of glory heroes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.