पर्स चोरणाऱ्या महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: October 23, 2014 22:50 IST2014-10-23T22:46:11+5:302014-10-23T22:50:06+5:30
सावंतवाडीतील घटना : पोलीस ठाण्यासमोरच व्हॅनमधून घेतली उडी

पर्स चोरणाऱ्या महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
सावंतवाडी : झाडू विक्रीच्या उद्देशाने गोव्याहून सावंतवाडीकडे एस.टी. बसने येत असलेल्या दोन महिलांनी एस.टी.तच एका महिलेची पर्स चोरून त्यातील दहा ग्रॅमचे किमती दागिने लंपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या महिलेला गाडीतील प्रवाशांनी रंगेहात पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस त्या महिलेला व्हॅनमधून ठाण्यात नेत असतानाच
त्यातील श्रावणी कोहली (वय ४२, रा. कोल्हापूर) या महिलेने पोलिसांच्या व्हॅनमधून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला येथील कुटिर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती अशी की, सायंकाळी पाच वाजता गोव्याहून सुटणाऱ्या पणजी-पुणे या एस.टी. बसमधून पश्चिम बंगाल येथील रिना बिश्वास या कुटुंबीयांसमवेत प्रवास करत होत्या. बिश्वास या पणजी येथे बसमध्ये चढल्या, तर आरती कोहली (वय ३२) व श्रावणी कोहली या महिला म्हापसा येथे बसमध्ये चढल्या. त्यांच्यासह दोन लहान मुलेही होती. ही बस सावंतवाडीत मोती तलावानजीक सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास येताच बिश्वास कुटुंबीय बसमधून उतरत असताना त्यांच्या मागील आरती व श्रावणी कोहली या महिलांनी रिना यांच्या पर्समध्ये हात घालून चेन हिसकावत आतील किमती दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. याची चाहूल रिना यांना लागली. तसेच अन्य प्रवाशांनीही ही घटना पाहिली. रिना यांनी आरडाओरडा केल्यावर प्रवाशांनी त्या दोघा महिलांना रंगेहात पकडले.
अचानक घडलेल्या प्रकाराने एसटी चालक व वाहक यांनाही काही कळले नाही. ही बस तलावाकाठी सुमारे अर्धा तास उभी होती. यावेळी शहरातील नागरिकही मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. एसटी वाहकाने याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस दाखल होत त्यांनी त्या दोन महिलांना ताब्यात घेतले. त्या महिलांना पोलीस व्हॅनमधून ठाण्यात घेऊन जात असतानाच त्यातील श्रावणी या महिलेने पोलीस ठाण्याच्या समोर गाडी येताच व्हॅनमधून उडी मारली. त्यावेळी तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्राव होत होता. पोलिसांनी पाणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे तिला पोलिसांनी कुटिर रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, महिलेने व्हॅनमधून उडी घेतल्याने पोलिसांची तारांबळ उडाली आहे.
पर्स चोरीप्रकरणी पोलिसांकडे लेखी तक्रार नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दाजी वारंग, संतोष नांदोस्कर करत आहेत. (प्रतिनिधी)