आकेरीत व्हरांड्यात भरली शाळा

By Admin | Updated: November 7, 2014 23:43 IST2014-11-07T21:55:32+5:302014-11-07T23:43:25+5:30

शाळेचे अपूर्ण बांधकाम : आश्वासनानंतर आंदोलन मागे

Vertex school in vermilion | आकेरीत व्हरांड्यात भरली शाळा

आकेरीत व्हरांड्यात भरली शाळा

कुडाळ : आकेरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १ च्या अपूर्णावस्थेत असलेल्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी कुडाळ बीडिओंना निवेदन दिले होेते. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पालकांनी शुक्रवारी विद्यार्थ्यांना शाळेच्या व्हरांड्यातच बसवित तिथेच शाळा भरविली. या आंदोलनानंतर आमदार वैभव नाईक व जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी शाळेला भेट देत शाळा व्यवस्थापन समितीशी चर्चा करत शाळेचे बांधकाम पूर्ण करण्यास सांगितले. यावेळी समितीने हे बांधकाम २0 दिवसात पूर्ण करण्याचे मान्य केल्यानंतर पालकांनी आंदोलन मागे घेतले.
आकेरी येथील प्राथमिक शाळेचे बांधकाम सर्व शिक्षा अभियानांतर्गत २0११ पासून सुरु करण्यात आले आहे. मात्र, इमारतीचे बांधकाम अद्याप अपूर्णावस्थेत आहे. अशा अपूर्ण असलेल्या धोकादायक इमारतीत मुलांना बसविण्यात येत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थ व पालकांनी याबाबत योग्य ती कारवाई करावी, असे निवेदन कुडाळ गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांना दिले होते.
आकेरी शाळा नं. १ च्या बांधण्यात आलेल्या इमारत अपूर्ण असून स्लॅबमधून पाण्याची गळती होत आहे. अशा धोकादायक इमारतीत पावसाळ्यातील महिन्यात मुलांना त्याच स्थितीत बसविण्यात आले होते. परंतु धोकादायक इमारतीत आम्ही मुलांना बसविणार कसे? काही धोकादायक घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. या धोकादायक इमारतीबाबत वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी केल्या. मात्र, शिक्षण विभागाने याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न मिळताच मुलांना शाळेत बसविण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची अन्यत्र सोय करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.
शाळेचे बांधकाम अपूर्ण असून खर्चाची रक्कम मात्र पूर्ण खर्च झाल्याचे निदर्शनास येत असल्याने या संदर्भात ठेकेदारास नोटीस बजावून रक्कम वसूल करून घ्यावी व त्याच्याकडून अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यास देऊ नये, अशी मागणीही केली आहे. या इमारतीच्या झालेल्या खर्चाबाबतच्या माहितीत तफावत असून कार्यकारी अभियंता सर्व शिक्षा अभियान, जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे वि. ब. खोटरे यांनी दिलेल्या अहवालात खर्च २२ लाख ९७ हजार १४३, तर विस्तार अधिकारी उदय सप्रे (शिक्षण विभाग) यांनी दिलेल्या अहवालात २२ लाख ३३ हजार ३३ एवढा खर्च झाल्याचे नमूद केले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या आकडेवारीत तफावत असून फौजदारी गुन्ह्यास पात्र असल्याचाही आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला होता.
मात्र, प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेबाहेर व्हरांड्यात बसवत आंदोलन सुरु केले. या आंदोलनाची दखल आमदार वैभव नाईक यांनी घेत शाळेला भेट देत पालकांशी व शाळा व्यवस्थापन समितीशी चर्चा करत समस्या जाणून घेतली. त्यानंतर शिक्षण विभागाला या इमारतीच्या बांधकामावर लक्ष देत काम पूर्ण करुन घेण्याचे आदेश दिले. तर जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनीही इमारतीची पाहणी करत शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्याशी चर्चा केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीतर्फे हे काम २0 दिवसात पूर्ण करुन घेण्याचे ठरविण्यात आले. अन्यथा शाळा बांधकाम ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. इमारत बांधकाम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, कृषी विस्तार अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नागेश सबनीस, मुख्याध्यापिका प्रज्ञा दाभोलकर, सूर्यकांत घाडी, महेश जामदार, शंकर जामदार, किशोर भिसे, सुहास सावंत, अभय राणे, राजाराम शिंदे, संतोष बागवे, आत्माराम जाधव, सुभाष गोसावी, प्रकाश आईर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Vertex school in vermilion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.