वेरॉन कामगार कपातीचा वाद चिघळणार !
By Admin | Updated: November 14, 2014 00:21 IST2014-11-14T00:21:43+5:302014-11-14T00:21:52+5:30
कामगार आयुक्तांचे प्रयत्न निष्फळ : युनियनची औद्योगिक न्यायालयात धाव

वेरॉन कामगार कपातीचा वाद चिघळणार !
रत्नागिरी : येथील मिरजोळे एमआयडीसीतील वेरॉन कंपनीने ५२ कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून टाकण्याच्या निर्णयाने निर्माण झालेला वाद चिघळला आहे. दरम्यान, रत्नागिरी सहायक कामगार आयुक्तांपुढेही वेरॉनच्या व्यवस्थापनाने ५२ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार नाही, असे सांगितल्याने हा वाद आता चिघळला आहे. सहायक कामगार आयुक्तांनी हा वाद मिटविण्याचा केलेला प्रयत्नही निष्फळ ठरल्याने कामगार कपातीच्या निर्णयास स्थगितीसाठी युनियन कोल्हापूर येथील औद्योगिक न्यायालयात जाणार असल्याचे बंबई मजदूर युनियनचे सरचिटणीस संजय वढावकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
तीन दिवसांपूर्वीच वेरॉन कंपनीतील १३ कायम कामगार व ३९ कंत्राटी कामगार अशा एकूण ५२ कामगारांना कोणतीही पुरेशा मुदतीची नोटीस न देता तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आले. कामावरून घरी गेल्यानंतर त्यांच्या घरच्यांकडे कामावरून कमी केल्याबाबतची नोटीस मिळालेली पाहून हे कामगारही चक्रावून गेले. व्यवस्थापनाच्या या निर्णयाविरोधात कमी केलेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनीसमोर आंदोलनही केले. मात्र, त्यालाही कंपनीने दाद दिली नाही.
अखेर आज, गुरुवारी दुपारी व्यवस्थापन प्रतिनिधी व कर्मचारी युनियनचे पदाधिकारी यांची सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्यासमोर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. या बैठकीस वेरॉन कंपनीचे सरव्यवस्थापक सुनील ढेणे, मनुष्यबळ व्यवस्थापक संतोष आगरे तसेच बंबई मजदूर युनियनचे सरचिटणीस संजय वढावकर, सचिव राजजनक गोस्वामी, युनियनचे स्थानिक सचिव उमेश वाडकर उपस्थित होते.
बैठकीत सहायक कामगार आयुक्त गुरव यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना अनेक सवाल करीत त्या ५२ कामगारांना परत घ्यावे लागेल. त्यांना बेकायदेशीररीत्या कमी करता येणार नाही, असे सुनावले. नियमांचे पालन न करता ५२ कामगारांना कामावरून कमी करण्याचा झालेला निर्णय अयोग्य आहे. कामगार कायदा प्रक्रियेची योग्य अंमलबजावणी व्हावी, या न्यायालयाच्या आदेशाचे कंपनीने पालन केले नसल्याचे वेरॉनच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. मात्र, याबाबत आमचे वरिष्ठ निर्णय घेतील, असे सांगत कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यासही वेरॉनच्या अधिकाऱ्यांनी नकार दिल्याचे कामगार आयुक्त गुरव यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर युनियनने वेरॉन कंपनीच्या कामगार कपातीच्या निर्णयास स्थगितीसाठी आज सायंकाळी कोल्हापूर औद्योगिक न्यायालयात धाव घेतली आहे. (प्रतिनिधी)