वेंगुर्लेतील कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत

By Admin | Updated: September 23, 2014 00:16 IST2014-09-22T22:38:22+5:302014-09-23T00:16:03+5:30

२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीला काँगे्रस- राष्ट्रवादी, शिवसेना -भाजप व अपक्ष अशी लढत झाली होती. यावेळी नारायण राणे व समर्थकांनी आघाडीचा धर्म पाळून केसरकर यांना सहकार्य केले होते.

Vengurlite activists are in a dilemma | वेंगुर्लेतील कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत

वेंगुर्लेतील कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत

प्रथमेश गुरव - वेंगुर्ले -सावंतवाडी मतदारसंघातील वेंगुर्ले तालुक्यात काँगे्रस - राष्ट्रवादी, शिवसेना युती तसेच मनसेचेही कार्यकर्ते खेडोपाडी विखुरलेले आहेत. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीला काँगे्रस- राष्ट्रवादी, शिवसेना -भाजप व अपक्ष अशी लढत झाली होती. यावेळी नारायण राणे व समर्थकांनी आघाडीचा धर्म पाळून केसरकर यांना सहकार्य केले होते. तसेच दीपक केसरकर यांचाही लोकसंपर्क मोठा असल्याने ते चांगल्या मतांनी विजयी झाले होते. मात्र, सद्यस्थितीत राजकीय गणिते बिघडलेल्या स्थितीत असून, केसरकर शिवसेनावासी झाले असल्याने कार्यकर्त्यांमध्येही संदिग्धता आहे. तसेच अजूनही कोणाला उमेदवारी मिळणार निश्चित नसल्याने जनताही व्दिधा मनस्थितीत आहे. केसरकरांचे या मतदारसंघातील प्राबल्य पाहता वेंगुर्लेमधूनही त्यांना पाठिंबा मिळण्यात आघाडीची आडकाठी होणार आहे.
यापूर्वी वेंगुर्र्ले तालुक्याचा समावेश नसताना मागील दोन वेळा शिवसेनेचे शिवराम दळवी काँग्रेस - राष्ट्रवादीअंतर्गत बंडखोरीमुळे निवडून आले होते. २००९ साली राष्ट्रवादीचे प्रवीण भोसले यांनी बंडखोरी केल्यामुळे दळवी हॅट्ट्रिक साधणार, असे मानले जात होते. परंतु मागील दोन वेळा संपूर्ण शिवसेना दळवींच्या मागे होती. त्यातील निम्मे राणेंसह काँगे्रसवासी झाले आणि त्यामुळेच शिवराम दळवी आमदार होऊ शकले नाहीत. राष्ट्रवादीच्या दीपक केसरकर यांना ६३,४३०, शिवसेनेच्या शिवराम दळवी यांना ४५,०१२, तर अपक्ष उमेदवार प्रवीण भोसले यांना १९,३६४ एवढी मते सावंतवाडी मतदारसंघातून पडली होती. त्यावेळी एकंदर वेंगुर्ले तालुक्यात नारायण राणेंचा प्रभाव जास्त होता.
२०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा केसरकर हे उमेदवार म्हणून असून, फक्त यापूर्वी आघाडीतर्फे लढले होते. यावेळी ते शिवसेनेतर्फे लढत असल्याचे संकेत आहेत. राणेंचे कट्टर समर्थक राजन तेली यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आघाडीतर्फे राजन तेली उमेदवार असल्याची चर्चा आहे. राडा प्रकरणानंतर वेंगुर्ले शहरातील जनतेने नगर परिषदेवर राष्ट्रवादीला एकहाती सत्ता दिली होती. परंतु राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादामुळे नगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळी दोन गट पडले. त्याचा शेवट म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या त्या १२ नगरसेवकांना अपात्र ठरवले. राष्ट्रवादीकडे एकहाती सत्ता देऊनही त्यांनी विश्वासघात केल्यामुळे विधानसभा निवडणुकीला येथील जनता पुन्हा राष्ट्रवादीला मतदान करील काय, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेला खाते खोलता आले नव्हते. मात्र, नुकत्याच झालेल्या वेंगुर्ले तालुका पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीत शिवसेनेचा सभापती बसला असून, उपसभापती काँग्रेस-राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळे पंचायत समिती मतदारसंघात दोघांचीही ताकद राहिल्याने मतदान विभागण्याची शक्यता आहे. पूर्वीचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी दीपक केसरकर यांच्यासमवेत शिवसेनेच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना युतीबरोबच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपला उमेदवार उभा करणार आहे. एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर विचार प्रणालीच्या हिंदू महासभेनेही आपल्या पक्षाचे पुनर्गठन केले असून, त्यांनीसुध्दा आपला उमेदवार जाहीर केला आहे.
एकंदर सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, अजूनही येथील जनता कोणत्या पक्षाला आपले मत देईल, हे समजणे कठीणच आहे. वेंगुर्ले तालुक्याच्या समस्याही बरीच वर्षे सुटण्याचे नाव घेत नाहीत. मायनिंगमुळे खराब होणारे रस्ते, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, पर्यटनासाठी पयाभूत सुविधांचा अभाव, एस. टी.ची विस्कळीत सेवा, शहरातील भुयारी गटार योजना, पाणी या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने पक्षाच्या उमेदवारांनी वरील समस्यांचा नुसताच विचार करु नये, तर त्यावर काही ठोस उपाययोजना करावी, अशीच मतदारांची अपेक्षा आहे.

Web Title: Vengurlite activists are in a dilemma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.