भाजीपाला,फळा-फुलांना मागणी

By Admin | Updated: August 25, 2014 22:13 IST2014-08-25T21:12:51+5:302014-08-25T22:13:31+5:30

गणेशोत्सवाची चाहूल : भाव गगनाला भिडले, चाकरमान्यांची हजेरी

Vegetable, fruit-flowers demand | भाजीपाला,फळा-फुलांना मागणी

भाजीपाला,फळा-फुलांना मागणी

अयोद्याप्रसाद गावकर - पुरळ --गणेश चतुर्थीच्या तोंडावर फळे व भाजीपाल्यांचे भाव कडाडले आहेत. या उत्सवामध्ये फळांना फार महत्त्व आहे. सध्या बाजारपेठांमध्ये सफरचंद, डाळींब, चिकू, पेरू, केळी, मोसंबी, संत्री येऊ लागले असून त्यांचे भावही गगनाला भिडल्यासारखे आहे. सफरचंदचा भाव १६० रूपये प्रतिकिलो आहे. याच सफरचंदचा भाव महिन्यापूर्वी १०० ते १२० रूपये होता.
तसेच स्थानिक लोकांनी आपल्या शेतामध्ये पिकवलेल्या पडवळ, काकडी, चिबुड, भेंडी आदी फळभाज्या बाजारपेठांमध्ये दाखल झाल्या आहेत. गणेशाच्या आगमनाला काही दिवसच राहिल्याने बाजारपेठांमध्ये ही फळे व भाज्या दाखल झाल्याने खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाची चाहूल लागल्यासारखी आहे.
देवगड तालुक्यामध्ये बहुतांश लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी भात व नाचणी शेती करतात. यातूनच बहुतांश शेतकरी हे आपल्या परसबाग व शेतामध्ये काकडी, चिबुड, पडवळ, भेंडी यांचीही लागवड करतात. ही लागवड विशेष करून गणेशोत्सवांमध्ये नैवेद्यामध्ये तरतूद करण्यासाठीच करीत असल्याचे दिसत आहे. देवगड, तळेबाजार, शिरगाव, मिठबाव, पडेल, विजयदुर्ग, फणसगाव या तालुक्याच्या मुख्य बाजारपेठांमध्ये परजिल्ह्यातून व्यापारी आठवडा बाजाराला येऊन प्रचंड प्रमाणात फळांची विक्री करीत आहेत. तसेच गणेशोत्सवामध्ये बाजारपेठांमध्ये या कालावधीमध्ये फळे विकतात. या फळांचा भाव हे परजिल्ह्यातील व्यापारी येथील ग्राहकांची पिळवणूक करून १०० ते १२० रूपये किलोने विकली जाणारी फळे १६०, १८० प्रतिकिलोने विकली जात आहेत. आठवड्याच्या बाजारामध्ये तालुक्यामधील व्यापारी हे ९० टक्के कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातीलच असल्याचे आढळून येतात. स्थानिक व्यापाऱ्यांची याबाबत उदासिनता असल्याचेही दिसते.
गणेशोत्सवामध्ये स्थानिकांनी स्वत:च्या बागायतींमध्ये लागवड करून जशी फळभाज्यांची पिके घेतात आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये विकतात, यामुळे योग्य किंमतीत भाज्या विकून हे व्यापारी आपला व्यवसाय करतात. अशाच पद्धतीने आठवड्याच्या बाजारामध्ये अन्य फळे, साहित्यांची विक्री केल्यास स्थानिकांच्या हाती पैसा येऊन रोजगार निर्माण होऊन परजिल्ह्यात जाणारा पैसा स्थानिकांच्या हाती राहिल्याने आर्थिक सुबत्ता येण्यास वेळ लागणार नाही. सध्या गणेशात्सवाच्या निमित्ताने या गोष्टी येथील व्यापाऱ्यांनी आत्मसात करणेही गरजेचे आहे.
मुंबईकरांच्या आगमनाला सुरूवात झाली असून काही चाकरमानी गावी येऊनच स्थानिक बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवाची खरेदी करतात. यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये गणेशोत्सव कालावधीमध्ये लाखो रूपयांची उलाढाल होत असते. गणेशाचे साहित्य, फळे, भाज्या, कापड दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते. अशा या गणेशाच्या आगमनाला काही दिवसच शिल्लक राहिल्याने उत्सुकता शिगेला पोहोचल्याने अखेरची खरेदी करतानाही गणेशभक्त दिसत आहेत. गणेशोत्सवामध्ये नैवेद्यामध्ये मोदक, पुजेमध्ये दुर्वा, फुलांमध्ये लाल जास्वंद, तसेच भजन महत्त्वाचे असते त्याचप्रमाणे फळे व भाजीपाल्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Web Title: Vegetable, fruit-flowers demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.