वाशिष्ठीला फुटतो बाराही महिने पाझर

By Admin | Updated: April 23, 2015 00:38 IST2015-04-22T22:52:20+5:302015-04-23T00:38:20+5:30

चिपळूण शहर : ...तर दहाव्या मजल्यापर्यंत विनावीज पाणी

Vasishthala breaks for 12 months | वाशिष्ठीला फुटतो बाराही महिने पाझर

वाशिष्ठीला फुटतो बाराही महिने पाझर

सुभाष कदम - चिपळूण--कोकणची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या चिपळूण शहराला वाशिष्ठी नदीमुळे बाराही महिने मुबलक पाणीपुरवठा होत असल्याने येथे पाणीटंचाईचा लवलेशही नसतो. भविष्यात नगर परिषदेने प्रस्तावित केलेली ग्रॅव्हिटीची नळपाणी योजना मंजूर झाली तर दहाव्या मजल्यापर्यंत विनावीज मुबलक पाणी चिपळूणकरांना मिळेल.
कोयना जलविद्युत प्रकल्पामध्ये वीजनिर्मिती करुन झाल्यावर तेथील मुबलक पाणी वाशिष्ठी नदीत सोडले जाते. त्यामुळे वाशिष्ठी नदीला बारमाही पाणी असते. परशुरामाच्या पावन भूमीत वाहणाऱ्या वाशिष्ठीला पाण्याची कधीही टंचाई भासत नाही. वाशिष्ठी नदीच्या पाण्याचा फारसा उपयोग होत नसल्याने केवळ पिण्यासाठी हे पाणी वापरुन समुद्राला सोडले जाते. वाया जाणारे हे अवजल रत्नागिरी, सिंधुदुर्गाची तहान भागवून मुंबईकडे वळवावे अशी मागणी अधूनमधून होत असते. खरं तर स्थानिक जनतेची गरज भागवून या पाण्याचा उपयोग इतरांना होऊ दिल्यास शासनाचा फायदाच होणार आहे.
उन्हाळा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. येथील नगर परिषदेतर्फे खेर्डी व गोवळकोट येथे जॅकवेल बांधून त्याद्वारे शहरातील विविध भागात पाणी पुरवठा केला जातो. अनेकवेळा भरती-आहोटीमुळे गोवळकोट भागात खाडीचे पाणी मिसळते आणि मचूळ पाणीपुरवठा होतो. चिपळूण शहर हे नदीकिनारी वसले असल्यामुळे रावतळे, मतेवाडी, ओझरवाडी, पागझरी, पाग या भागाला पूर्वी पाण्याची काही काळ टंचाई भासत होती. परंतु, आता नव्याने नळपाणी योजना टाकल्याने या भागातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे. शिवाय दोन वर्षांपूर्वी वाशिष्ठी नदीतील गाळही काढण्यात आला. त्यामुळे नदीची खोली वाढली व पाण्याचा साठाही मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. पूर्वी भारनियमन व कोयनेच्या वीज निर्मितीचे टेलवॉटर न सोडल्यास काही काळ पाण्याची टंचाई भासत असे. परंतु, आता तशी स्थिती राहिलेली नाही. त्यातच चालू वर्षीही वीजनिर्मिती अद्याप सुरु आहे. त्यामुळे नदीलाही मुबलक पाणी सोडले जात आहे. यावर्षी पाणी टंचाई भासण्याची शक्यता नाही असे पाणी पुरवठा विभागप्रमुख अंजली कदम यांनी सांगितले.
नगराध्यक्षा सावित्री होमकळस, उपनगराध्यक्ष लियाकत शाह, मुख्याधिकारी प्रकाश पाटील व माजी आमदार रमेश कदम यांनी शहरात कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीने पाणी आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी या योजनेला तत्त्वत: मान्यता दिली होती. परंतु, आता सरकार बदलले असल्याने या प्रस्तावित योजनेचे भविष्य धुसर झाले आहे. या योजनेसाठी नगर परिषद पाठपुरावा करीत आहे. ही योजना मंजूर झाल्यास पुढील २५ वर्ष चिपळूणकरांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.
सध्या गोवळकोट येथून गोवळकोट, गोवळकोट रोड, पेठमाप, मुरादपूर, उक्ताड व बाजारपेठेचा काही भाग येथे पाणी पुरवठा होतो. तर खेर्डी येथून बहादूरशेख, रावतळे, काविळतळी, मार्कंडी, पाग, ओझरवाडी, मतेवाडी, चिंचनाका व बाजारपेठ या भागाला पाणी पुरवठा केला जातो. चिपळूण शहरासाठी १२ टाक्यांतून पाण्याचा पुरवठा केला जातो. गोवळकोट व खेर्डी येथील जॅकवेलमधून प्रतिदिन प्रत्येकी ७.५ एमएलडी पाणी उचलले जाते. शहरातील प्रत्येक व्यक्तीला दरडोई १३५ लीटर पाणी पुरविले जाते.
शहरातील नागरिकांना पुरेसे व मुबलक पाणी मिळत असल्याने पाणीपट्टी वसुलीही चांगली होऊ लागली आहे. चालू वर्षी पाणीपट्टीपोटी १ कोटी २२ लाख रुपयांची मागणी होती. त्यापोटी १ कोटीची पाणीपट्टी वसुली ३१ मार्च अखेर झाली आहे. त्यामुळे पाणीपट्टीची वसुलीही समाधानकारक आहे. पाण्यासाठी कोणत्याही भागातील नागरिकाला वणवण करावी लागत नाही. त्यामुळे कोकणातील ही राजधानी पाण्याने ओतप्रोत भरलेली आहे. वाशिष्ठी, शीव नदीमुळे या शहराला पाण्याची टंचाई भविष्यात भासणार नाही. पण नगर परिषदेने त्यासाठी योग्य नियोजन करायला हवे.

चिपळूण शहराला मुबलक व स्वच्छ पाणी देण्यासाठी नगर परिषद सातत्याने प्रयत्नशील असते. वाशिष्ठीतून पाणी उचलले जात असल्याने ते शुध्द करुनच वापरावे लागते. यासाठी खेर्डी जॅकवेल व गोवळकोट येथे पाणी फिल्टरेशन प्लँट उभारण्यात आला आहे. त्याद्वारे पाणी शुध्द करुनच शहराला पुरविले जाते.
वाशिष्ठी नदी दाभोळ खाडीला मिळत असल्याने खाडीच्या तोंडावर भरती-आहोटीनुसार खारे पाणी नदीत मिसळते. ते पाणी भरतीच्या काळात नदीपात्रात येते. त्यामुळे शहरातील गोवळकोट, गोवळकोट रोड व बाजारपेठ, पेठमाप, उक्ताड या भागातील नागरिकांना काही वेळा मचूळ पाणी प्यावे लागते. यावर्षी नदीला मुबलक पाणी असल्याने मचूळ पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे.


शहरातील पाग भागात पाग झरीचे पाणी पावसाळ्यात वापरले जाते. हा नैसर्गिक स्रोत असून जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये येथील पाणी कमी होते व टंचाई भासू लागते. पूर्वी या भागात पाण्याची टंचाई असे. परंतु, आता सुधारित नवीन नळपाणी योजनेमुळे या भागाला पाण्याची टंचाई भासत नाही. या भागातील पाण्याचा प्रश्न आता संपुष्टात आला आहे.

शहराला १२ मोठ्या टाक्यांतून पाण्याचा पुरवठा केला जातो. खेर्डी येथे ११ लाख लीटर, ७ लाख लीटर अशा दोन टाक्या आहेत. डीबीजे महाविद्यालय येथे ८ लाख लीटर, पाग येथे ४ लाख लीटर व २ लाख लीटर अशा २ टाक्या आहेत. खेंड कांगणेवाडी येथे ८ लाख लीटर, खेंड येथे ६ लाख लीटर्सच्या २, कांगणेवाडी येथे ६० हजार लीटरची १ पाण्याची टाकी आहे. तर गोवळकोट येथे ७ लाख लीटरची व ५ लाख लीटरची जुनी अशा टाक्या कार्यरत आहेत.

चिपळूणच्या वैभवात भर टाकणारी व संथ वाहणारी वाशिष्ठी नदी ही चिपळूणकरांची खऱ्या अर्थाने जीवनदायिनी आहे. कारण उन्हाळ्यात या नदीचे खळाळते थंडगार पाणी अनेकांचा दाह घालवित असते. उन्हाळ्यात पर्यटकांनाही ती आकर्षित करते तर पावसाळ्यात ती दुथडी भरुन वाहत असते. वाशिष्ठीचे दर्शन हे पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरते.



वाशिष्ठी नदीपात्रात अनेकवेळा बकऱ्या, कोंबड्यांचे अवशेष टाकले जातात. त्यामुळे पाणी दूषित होते. काही ठिकाणी शौचालयाचे सांडपाणी थेट नदीपात्रात सोडलेले आहे. याचीही एकदा पाहणी होऊन संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे. कारण दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे आजार फैलावण्याचा धोका आहे.


चिपळूण शहर व परिसराला गोवळकोट व खेर्डी पंपहाऊस येथून पाणीपुरवठा केला जातो. सुधारित योजना अंतिम टप्प्यात असून काही भागात चाचपणी सुरु आहे. या योजनेचे १० टक्के काम अपूर्ण आहे. आवश्यक त्या ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचे कामही सुरु आहे.



चिपळूणच्या वाशिष्ठी नदीने शहराची मुख्य समस्या मिटवली आहे. त्यामुळे चिपळूणला पाणीटंचाई जाणवत नाही. ७२०० खासगी जोडण्यांसह १८ सार्वजनिक नळजोडण्या एवढा पाणीपुरवठ्याचा मोठा व्याप असतानाही चिपळूण पालिकेची डोकेदुखी वाशिष्ठी नदीने मिटवली आहे. त्यामुळे पाणीटंचाई आणि चिपळूण हे न जुळणारे समीकरण आहे, असेच म्हणावे लागेल.

Web Title: Vasishthala breaks for 12 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.