गणेशोत्सवानिमित्त उद्यापासून विविध कार्यक्रमांची रेलचेल
By Admin | Updated: September 30, 2015 00:04 IST2015-09-29T21:45:41+5:302015-09-30T00:04:56+5:30
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या ४२ दिवस चालणाऱ्या संस्थांनी थाटाच्या सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक, धार्मिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन

गणेशोत्सवानिमित्त उद्यापासून विविध कार्यक्रमांची रेलचेल
आचरा : इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या ४२ दिवस चालणाऱ्या संस्थांनी थाटाच्या सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक, धार्मिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आचरे दशक्रोशीमधील सर्व आबालवृद्धांना यानिमित्त अनोख्या पर्वणीचा आनंद लुटता येणार आहे.या गणेशोत्सवामध्ये गुरुवार १ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ज्येष्ठ नागरिक दिनाचे आयोजन आचरा दशक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे करण्यात आले आहे. तर रात्री १० वाजता चामुंडेश्वरी फुगडी संघ कविलकाटे (कुडाळ) यांच्या बहारदार फुगडीचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार ३ आॅक्टोबर रोजी रात्री १० वाजता गणेश दशावतार नाट्यमंडळ कडावल (कुडाळ) यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. सोमवार १२ आॅक्टोबर रोजी १० वाजता गोरे दशावतार नाट्यमंडळ यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. बुधवार १४ आॅक्टोबर रोजी रात्री १० वाजता आमची शाळा आमचे गुणदर्शन हा पहिली ते नववीपर्यंतच्या शालेय विद्यार्थीवर्गाचा सहभाग असलेला कार्यक्रम होणार आहे.
शनिवार १७ आॅक्टोबर रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार १९ आॅक्टोबर रोजी रात्री १० वाजता देवगड येथील आर्ट सर्कल प्रस्तुत तीन अंकी संगीत नाटक गोरा कुंभार सादर होणार आहे. शुक्रवार २३ आॅक्टोबर रोजी रात्री १० वाजता खुली वन नाईट आमने सामने डबलबारी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शनिवार २४ आॅक्टोबर रोजी प्रतिवर्षाप्रमाणे सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मुंंबई येथील भजनी बुवा दुर्वास गुरव विरुद्ध पोखरण येथील भजनी बुवा समीर कदम यांच्यामध्ये डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. मंगळवार २७ आॅक्टोबर रोजी आचरावासियांची महाआरती होणार असून बुधवार २८ आॅक्टोबर रोजी ‘श्रीं’च्या गणेशमूर्तीचे विसर्जन भव्य मिरवणुकीने आचरा पिरावाडी येथील समुद्रकिनारी होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ रसिकांनी घ्यावा, असे आवाहन इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे अध्यक्ष संतोष मिराशी व कार्याध्यक्ष कपिल गुरव यांनी केले आहे. (वार्ताहर)
नाविन्यपूर्ण अभंग स्पर्धा
सोमवार ५ आॅक्टोबर रोजी ‘सार सांगूनी गा रे अभंग’ ही नाविन्यपूर्ण जिल्हास्तरीय स्पर्धा होणार आहे. बुधवार ७ आॅक्टोबर रोजी वाई येथील किर्तनकार शरद घाग यांचे कीर्तन होणार आहे. शनिवार १० आॅक्टोबर रोजी रात्री १० वाजता बालगोपाळ मंडळ आचरा वरची चावडी यांचा ‘श्रावण मासी हर्ष मानसी भाद्रपदी नमू गणरायसी’ हा बहारदार संस्कृती दर्शनाचा कार्यक्रम होणार आहे.