राज्यात हिंदी पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रम
By Admin | Updated: September 4, 2014 00:05 IST2014-09-03T23:29:13+5:302014-09-04T00:05:00+5:30
राज्य हिंदी शिक्षक महामंडळ : शिक्षण तसेच बँकींग क्षेत्रातर्फे राबवणार उपक्रम

राज्यात हिंदी पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रम
चिपळूण : हिंदी भाषेला दि. १४ सप्टेंबर १९४९ रोजी राष्ट्रभाषेचा दर्जा मिळाला आहे. तेव्हापासून राज्यात हा दिवस हिंदी राष्ट्रभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून दि. ३० सप्टेंबरपर्यंत सर्वत्र हिंदी पंधरवडा साजरा केला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा अनुदानित, विनाअनुदानित इंग्रजी उर्दू माध्यमाच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालय, बँका व जिल्हा तालुका मंडळातर्फे हा राष्ट्रभाषा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.
जगातील १८९ देशांमधून हिंदी भाषा बोलली जाते. हिंदी भाषा विश्वभाषा बनली आहे. हिंदीमधील लेखक, कवी, कादंबरीकार, एकांकिकाकार, नाटककार व हिंदी साहित्यिकांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, या दृष्टीने हिंदी शिक्षकांसाठी निबंध स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असल्याची माहिती जोशी यांनी दिली.
विद्यार्थ्यांना हिंदी लिहिता, बोलता, वाचता यावे, हिंदी भाषेची कौशल्य विद्यार्थ्यात विकसित व्हावेत, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याच्या दृष्टीने राष्ट्रभाषा हिंदीचा प्रसार, प्रचार करावा, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष जोशी यांनी केले आहे. राष्ट्रभाषा हिंदी प्रचार समितीकडून शिक्षकांसाठी हिंदी सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे. एकूण पंधरा शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे. शिवाय राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या परीक्षेसाठी शंभरहून अधिक विद्यार्थी असणाऱ्या शाळांनाही प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.(वार्ताहर)
हिंदी शिक्षकांना आवाहन
रत्नागिरी जिल्हा राष्ट्रभाषा प्रचार समिती रत्नागिरी जिल्हा हिंदी शिक्षक मंडळ महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळ यांच्यातर्फे हिंदी सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्कारासाठी माहिती पाठवावी असे आवाहन अनिलकुमार जोशी यांनी केले आहे. एकूण १५ पुरस्कार दिले जाणार असून राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धाच्या परीक्षेसाठी १०० च्यावर विद्यार्थी संख्येने बसविणाऱ्या शाळा, ग्रामीण भागातील सतत काम करणाऱ्या शाळांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ३० सप्टेंबर रोजी खेड येथे होणार आहे.