वाफोली धरण कोरडे
By Admin | Updated: May 20, 2016 22:44 IST2016-05-20T21:36:20+5:302016-05-20T22:44:52+5:30
पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार : मान्सून लांबल्यास समस्या वाढणार

वाफोली धरण कोरडे
बांदा : वाफोली गावचे जीवनदायिनी असणारे लघु पाटबंधारे विभागाचे धरण हे पूर्णपणे कोरडे पडल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. हवामान खात्याने मान्सूनचे आगमन लांबण्याचे संकेत दिल्याने पाण्याअभावी स्थानिकांना भीषण पाणीटंचाईशी सामना करावा लागणार आहे.वाफोली पंचक्रोशीत हरितक्रांती व्हावी यासाठी इंडो-जर्मन प्रकल्पाअंतर्गत या धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात धरणात मुबलक पाणीसाठा होत असल्याने हा परिसर सुजलाम् सुफलाम् झाला होता. मात्र, कालांतराने धरणाच्या देखभाल दुरुस्तीकडे लघु पाटबंधारे खात्याने दुर्लक्ष केल्याने धरणातून पाणी गळती होऊ लागली. याचा विपरीत परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर झाला. उन्हाळ्यात हे धरण पूर्णपणे कोरडे पडत असल्याने या धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या वाफोली नळपाणी योजनेवर याचा विपरीत परिणाम होतो.गतवर्षी वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात धरणाच्या मुख्य गेटचा दरवाजा तुटल्याने या धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाहून गेला होता. त्यामुळे गेल्यावर्षी ऐन एप्रिल महिन्यातच या धरणातील पाणी पातळीत कमालीची घट झाली होती. यावर्षी देखील तशीच परिस्थिती असून मे महिन्यात या धरणातील पाणीसाठा पूर्णपणे आटला आहे. या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्याने वाफोली गावातील बागायती शेती पूर्णपणे करपून गेल्या आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात या धरणातील पाणीसाठा कमी होतो. (प्रतिनिधी)
पाटबंधारे विभागाने लक्ष द्यावे --दरवर्षी धरण कोरडे पडत असल्याने उन्हाळ्यात होणारी पाणीटंचाई रोखण्यासाठी या धरणाच्या दुरुस्तीकडे लघु पाटबंधारे विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिकांतून होत
आहे.