मालवणच्या ३५ कोटींच्या अर्थसंकल्पास मान्यता

By Admin | Updated: February 27, 2015 23:24 IST2015-02-27T21:29:01+5:302015-02-27T23:24:42+5:30

नगरपालिका सभा : विरोधी नगरसेवकांकडून टीका

Validation of Malwaan's budget of 35 crores | मालवणच्या ३५ कोटींच्या अर्थसंकल्पास मान्यता

मालवणच्या ३५ कोटींच्या अर्थसंकल्पास मान्यता

मालवण : मालवण नगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी सायंकाळी झाली. यावेळी ४ लाख ४५ हजार ७०० रूपयांच्या शिल्लकेसह एकूण ३५ कोटी ८३ लाख ६४ हजार रूपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली.मालवण शहर पर्यटनदृष्ट्या विकसीत होत असताना मालवण नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात पर्यटन वाढ, पालिकेची उत्पन्न वाढ, आरोग्य सुविधा, नवे प्रकल्प यासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. गेल्यावर्षीप्रमाणेच नव्या वर्षी अर्थसंकल्प केवळ जमा-खर्च मांडणारा अर्थसंकल्प असल्याची टीका मालवण शहर विकास आघाडीचे नगरसेवक नितीन वाळके, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी केली. तर काँग्रेसचे नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी नागरिकांवर कोणताही कराचा बोजा न ठेवता अर्थसंकल्प मांडल्याचे समर्थन केले.यावेळी काँग्रेसचे नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी पालिका प्रशासनाने अर्थसंकल्पांना नागरिकांच्या डोक्यावर कोणत्याही प्रकारचा कर न लादता हिताच्यादृष्टीने अर्थसंकल्प सादर केला, अशा शब्दात त्यांनी समर्थन केले.यावर प्रशासनाची बाजू मांडताना मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी, पालिकेचे स्वत:चे उत्पन्न कमी असल्याने खर्चाचा विचार केला गेला नाही. पर्यटन, आरोग्य, रस्ते या पायाभूत सुविधांसाठी वेगळे बजेट न करता नगरोत्थान, दलितवस्ती योजना या योजनांतून अपेक्षित बाबी पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. उत्पन्न कमी असल्याने पालिकेला निधी उभारणे शक्य नसल्याचे माळी यांनी सांगितले.
माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी, नगरपालिकेचे आर्थिक उत्पन्न बुडविणाऱ्या करवसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनातून वसुली करावी, अशी मागणी केली.
मालवण शहर हद्दीत भरड ते एसटी स्टॅण्ड परिसरात फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्या असताना आरोग्य विभाग कारवाई करीत नाही. त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचना नगरसेविका पूजा करळकर यांनी केल्या. नगरसेवक नितीन वाळके यांनी मालवण नगरपरिषदेने वर्षभरापूर्वी प्लास्टिक बंदी परिणामकारक राबवली
होती.
आता मोहीम थंडावली असल्याचा आरोप केला. माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी नगराध्यक्षांकडून लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा होत्या, मात्र आता अपेक्षाभंग झाला. नगराध्यक्षाचा आक्रमकपणा नाहिसा झाला असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

लोकप्रतिनिधींनी स्वत:च्या भूमिकेवर ठाम रहावे
कारवाई करण्यासाठी मोहीम हाती घेतल्यावर काही लोकप्रतिनिधींचा मतांच्या राजकारणासाठी कारवाई करू नये. प्रशासनाला असे फोन केले जातात. यामुळे कारवाईच्या भूमिकेवर लोकप्रतिनिधींनी ठाम रहावे, मात्र नंतर माघार घेतल्यास गप्प बसणार नाही. - अशोक तोडणकर, नगराध्यक्ष


प्रशासनाने अर्थसंकल्पाची औपचारिकता पूर्ण केली
भविष्याचा विचार करून पर्यटनवाढीसाठी पालिकेने अर्थसंकल्पात भरीव तरतुदी सुचविणे गरजेचे असताना प्रशासन मागील वर्षाप्रमाणे नव्या वर्षी अर्थसंकल्प मांडते. मालवण पालिकेने केवळ इतर नगरपालिकांचा, शहरांचा आदर्श घेत स्वप्न बघावित का? नागरिकांच्या हिताच्यादृष्टीने अर्थसंकल्प मांडला जावा. यापूर्वीच्या अर्थसंकल्पाची औपचारीकता प्रशासनाने पूर्ण केली आहे.
- महेश जावकर, नगरसेवक

कर वसुलीचा आलेख उतरता कसा?
भाजी मंडई व मच्छिमार्केट वसुलीसाठी पालिकेचे कर्मचारी असताना वसुलीच्या टक्केवारीत वाढ होणे अपेक्षित असताना दरवर्षी घट का होते? गेल्या तीन वर्षात ३ लाख रूपये आर्थिक उत्पन्न बुडाले आहे. कर्मचाऱ्यांकडून वसुली होत नसेल तर वसुलीसाठी अभिकर्त्यांची नियुक्ती करण्यात यावी.
- महेंद्र म्हाडगुत, नगरसेवक
अर्थसंकल्पात जनतेचे प्रतिबिंब दिसले पाहिजे
पर्यटनदृष्ट्या मालवण शहर विकसित होत असताना पर्यटनवाढीसाठी पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात केली नाही. अर्थसंकल्पात जनतेचे प्रतिबिंब दिसले पाहिजे. मात्र पालिकेचा अर्थसंकल्प केवळ जमा-खर्च मांडणारा आहे. - नितीन वाळके, नगरसेवक

Web Title: Validation of Malwaan's budget of 35 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.