वायंगणी किनारी कासवांचा जन्मसोहळा
By Admin | Updated: February 2, 2015 00:17 IST2015-02-01T23:12:34+5:302015-02-02T00:17:40+5:30
पर्यटकांची गर्दी : कासव जत्रेनिमित्ताने निसर्ग अन माणसाचे नाते दृढ

वायंगणी किनारी कासवांचा जन्मसोहळा
प्रथमेश गुरव - वेंगुर्ले -वायंगणी येथे कासव जत्रेला आलेल्या पर्यटकांनी निसर्ग व मानव यांच्यातील अतूट नाते अनुभवतानाच कासवांचा जन्मसोहळाही पाहिला. वायंगणी येथे आलेल्या पर्यटकांनी इथली खाद्य संस्कृती, सांस्कृतिक कार्यक्रम, जंगल सफर, धार्मिक व पर्यटनस्थळांची माहिती घेत कोकणी आदरातिथ्याचेही तोंड भरुन कौतूक केले.
किरात ट्रस्ट व वायंगणी ग्रामस्थांच्या पुढाकाराने वायंगणी समुद्र किनाऱ्यावर असलेल्या आॅलिव्ह रिडले या दुर्मीळ कासवांच्या जत्रेची सांगता रविवारी कासवांच्या जन्म सोहळ्याने झाली. ३० जानेवारीपासून सुरू असलेल्या या कासव जत्रेत मुंबई, पुणे, कोल्हापूर, जळगाव, रत्नागिरी, औरंगाबाद आदी ठिकाणांहून ६५ कुटुंबे सहभागी झाली होती. पर्यटकांनी इथल्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेतला. जत्रेच्या पहिल्या दिवशी वायंगणी येथील आेंकार दशावतार नाट्य मंडळाचे नाटक व मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या ‘मालवणी गाण्यांचा’ कार्यक्रम सादर करण्यात आला. दुसऱ्या दिवशी पर्यटकांना वायंगणी ग्रामस्थांच्या सहकार्याने जंगलातील विविध वनस्पतींची, प्राण्यांची तसेच वेंगुर्लेतील प्रसिध्द धार्मिक स्थळांची, पर्यटन स्थळांची माहिती देण्यात आली. रात्री ‘शेकोटी’ कार्यक्रम झाला. कासव जत्रेच्या निमित्ताने वायंगणी किनाऱ्यावर काढलेले वाळू शिल्प लक्षेवधी ठरले. जत्रेच्या तिसऱ्या दिवशी पर्यटकांनी कासवांचा जन्मसोहळा अनुभवला. गेल्या ५५ ते ६० दिवसांपूर्वी वायंगणी किनाऱ्यावर आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवांची अंडी मिळाली होती. कासवमित्र सुहास तोरसकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची उत्तमप्रकारे काळजी घेऊन सुरक्षित जागेत ठेवली होती. या अंड्यांतून कासवाची पिल्ले बाहेर आली असून, त्यांचा हा जन्म सोहळा पाहून पर्यटक भारावून गेले आहेत. वेंगुर्ले तहसीलदार जगदीश कातकर, वायंगणी सरपंच शामसुंदर मुणनकर, निसर्गप्रेमी यांनी ‘कासव जत्रा’ उपक्रमाचे कौतुक केले.
वायंगणीत मत्स्य संग्रहालय व्हावे
किरात ट्रस्टने चार वर्षांपूर्वी कृतीशील उपक्रमांना सुरुवात केली आहे. कासव जत्रेच्या निमित्ताने गावामध्ये होणारे बदल जरी सावकाश होत असले, तरी ते कायम टिकणारे आहेत. पर्यटकांना विश्वास निर्माण झाल्यामुळे येथे दरवर्षी पर्यटक वाढत आहेत. याठिकाणी मत्स्य संग्रहालय झाल्यास नक्कीच वायंगणी गाव भारताच्या नकाशावर उदयास येईल, अशी अपेक्षा ट्रस्टचे सचिव शशांक मराठे यांनी व्यक्त केली आहे.
वायंगणीतील ग्रामस्थ आपल्याच घरातील सदस्यांप्रमाणे या कासवांचे रक्षण करून त्यांना सुरक्षित असलेल्या समुद्री अधिवासात सोडतात. यावरून ग्रामस्थांची समुद्री जीवांबद्लची आत्मियता दिसून येते. हे सर्व पाहण्यासाठी आम्ही दरवर्षी कासव जत्रेला उपस्थित असतो.
महेश पटवर्धन,
पर्यटक, पुणे
कासव जत्रेमुळे वायंगणी ग्रामस्थांमध्ये बदल झाला आहे. फ क्त दोन ते तीन घरांमध्येच पर्यटकांची व्यवस्था होती. ग्रामस्थांनी भविष्याचा अंदाज घेऊन घरांमध्ये पर्यटकांना आवश्यक त्या सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यामुळे यावर्षी १५ ते ५० कुटुंबांमध्ये पर्यटकांची सोय करणे शक्य झाले आहे.
चंद्रशेखर तोरसकर,
पर्यटक
कासव जत्रा उपक्रमामध्ये पर्यटकांची सोय गावातील घरांमध्ये केल्यामुळे त्यांना ग्रामीण जीवनाचा अनुभव लुुटता आला नाही. तसेच फास्ट फूडच्या जमान्यातही पर्यटकांना आम्हा महिलांना स्थानिक खाद्यपदार्थ देता आले. त्यामुळे इथल्या खाद्य संस्कृतीचा प्रसार व प्रचार होण्यास मदत झाली आहे.
मंगल खडपकर,
भोजन व्यवस्थापिका