भास्कर जाधवांवर वायकर यांचा पलटवार

By Admin | Updated: November 19, 2015 00:43 IST2015-11-18T23:41:13+5:302015-11-19T00:43:50+5:30

विकास आराखड्यात असमतोलपणा असल्याचा आरोप निराधार

Vaikar's counterpart on Bhaskar Jadhav | भास्कर जाधवांवर वायकर यांचा पलटवार

भास्कर जाधवांवर वायकर यांचा पलटवार

रत्नागिरी : जिल्हा नियोजन मंडळाच्या या वर्षाकरिता केलेल्या दीडशे कोटींच्या विकास आराखड्यात असमतोलपणा असल्याचा आमदार भास्कर जाधव यांचा आरोप निराधार आहे. निधीचे वाटप नियमानुसार व तालुकावार समान होणार आहे. आधीच्या पालकमंत्र्यांनी आपल्याच भागात १४ कोटींपेक्षा अधिक निधी वापरून अन्य भागांवर अन्याय केला होता. अन्य आमदारांना विकासासाठी केवळ २ ते अडीच कोटी रुपयेच मिळाले होते, असा आरोप पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आज (बुधवार) पत्रकारपरिषदेत केला.
जिल्हा नियोजन मंडळाची बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी आराखड्यानुसार विकासकामांच्या प्रस्तावाची काय स्थिती आहे, याची माहिती वायकर यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. यावेळी सरकारच्या एक वर्षांच्या काळात जिल्ह्यात केलेल्या विकासकामांचा अहवाल सादर केला. या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत तक्रारी आल्या. त्यानुसार आपण त्यांच्याशी याआधी चर्चा केली आहे. तरीही त्यात सुधारणा न झाल्यास अ‍ॅक्शन घेणे भाग पडेल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
राज यांचा आरोप चुकीचा
महापौर बंगल्याची जागा सेनाप्रमुख ठाकरे यांना खूप प्रिय होती. त्यामुळे तेथे स्मारक उभारण्याचा निर्णय योग्यच असल्याचे शिवसेनेचे मत आहे. याबाबत राज ठाकरे यांचा आरोप चुकीचा आहे. स्मारकाला विरोध करणाऱ्या राज यांचा काकांबाबतचा आदरभाव गेला कुठे, असा सवाल वायकर यांनी केला.
...तर मी भाग्यवानच
माझ्या मातोश्री क्लबसाठी ५ एकर जागा दिली जाते, तर ठाकरेंच्या स्मारकासाठी अडीच एकर जागा का ? असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. त्याबाबत वायकर म्हणाले, या प्रकल्पाच्या ठिकाणी सेनाप्रमुखांचे स्मारक झाले तर मी भाग्यवान समजेन. परंतु ज्याठिकाणी सेनाप्रमुख वावरत होते, बैठका घ्यायचे ते त्यांचे प्रिय ठिकाण महापौर बंगल्याचेच आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Vaikar's counterpart on Bhaskar Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.