वैभववाडीला पावसाने झोडपले
By Admin | Updated: July 10, 2016 23:45 IST2016-07-10T23:45:08+5:302016-07-10T23:45:08+5:30
पडझडीमुळे लाखोंची हानी : बंदरात धोक्याचा तीन नंबरचा बावटा

वैभववाडीला पावसाने झोडपले
मालवण : मालवणात दमदार पावसासह वादळी वाऱ्यांनी जोर पडकला आहे. शनिवारपासून वादळी वाऱ्यांनी जोर धरल्याने समुद्रही चांगलाच खवळलेला आहे. तालुक्यात पडझडीचे सत्र सुरुच असून धुरीवाडा भागात नितीन आचरेकर यांच्या घरावर माडाचे झाड कोसळून सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले आहे. देवबाग येथील जेमनीस फर्नांडिस यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले. धुरीवाडातील पोलिस पाटील वासुदेव गावकर यांच्या घरावर माडाचे झाड कोसळून नुकसान झाले.
दरम्यान, मालवणात पावसाने २ हजार मिलीमीटरचा टप्पा गाठला आहे. दिवसभरात ५४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. तालुक्यातील अनेक भागात शेती पाण्याखाली गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. नदी-नाले ओसंडून वाहत असून धबधबेही धो-धो कोसळत आहेत. पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कासारटाका येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
मालवणात वाऱ्यांचा वेग वाढला असून किनारपट्टीवर लाटा धडकत आहेत. समुद्रात ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहत असून बंदर विभागाने शनिवारी पुन्हा एकदा धोक्याचा तीन नंबर बावटा लावला आहे.
गेल्या १५ दिवसात बंदरात धोक्याचा तीन नंबर बावटा तीन वेळा लावण्यात आला. मच्छिमारांनी मासेमारीस जावू नये. तसेच किनारपट्टी भागातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे बंदर विभागाकडून सूचित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)