वैभव नाईक विजयाचे शिल्पकार : तीन पैकी दोन जागांवर निर्णायक आघाडी
By Admin | Updated: October 20, 2014 22:29 IST2014-10-20T22:00:51+5:302014-10-20T22:29:48+5:30
जिल्ह्याच्या राजकारणात इतिहास रचला. सिंधुदुर्गात ९ वर्षानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन आमदार निवडून

वैभव नाईक विजयाचे शिल्पकार : तीन पैकी दोन जागांवर निर्णायक आघाडी
महेश सरनाईक - कणकवली -गेल्या २४ वर्षात नारायण राणे यांनी आपल्या भोवती फिरत ठेवलेल्या सिंधुदुर्गातील राजकीय वातावरणाला विधानसभा निवडणुकीत तिलांजली मिळाली. सलग सहावेळा निवडून आलेल्या नारायण राणे यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी दहा हजार मतांनी पराभव करत जिल्ह्याच्या राजकारणात इतिहास रचला. सिंधुदुर्गात ९ वर्षानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन आमदार निवडून आले आहेत. सावंतवाडी आणि कुडाळ मतदार संघावर भगवा फडकला आहे. जिल्ह्यात झालेल्या मतदानामध्ये शिवसेना काँग्रेसपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर गेली आहे. तर शिवसेनेला मिळालेल्या विजयाचे सर्व श्रेय आमदार वैभव नाईक यांनाच जात आहे.
वैभव नाईक हे काही वर्षांपूर्वी काँग्रेसचे कार्यकर्ते होते. मात्र, ज्यावेळी नारायण राणे यांनी सन २00५ मध्ये शिवसेनेला सोडचिठ्ठी देवून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर येथील राजकीय समीकरणे बदलली. राणेंच्या काँग्रेस प्रवेशानंतर काही कालावधीत वैभव नाईक यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मात्र, त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यावेळी शिवसेनेची धुरा माजी आमदार परशुराम उपरकर वाहत होते. मात्र, त्यावेळची परिस्थिती सेनेच्यादृष्टीने तशी समाधानकारक नव्हती.
ज्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैभव नाईक यांच्या खांद्यावर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविली. त्यानंतर गेली आठ वर्षे त्यांनी अहोरात्र परीश्रम करत. त्यावेळी असलेल्या शिवसैनिकांनाा हाताशी धरून त्यांच्या समस्यांना सामोरे जात शिवसेनेला हळूहळू योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर सन २00९ च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांच्या विरोधात मालवण-कुडाळ मतदार संघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली. मुळचे कणकवलीत असलेल्या नाईक यांना कुडाळ आणि मालवण हे दोन तालुके तसे नवखेच होते. मात्र, असे असतानाही त्या निवडणुकीत त्यांनी ४५ हजारांपेक्षा जास्त मते मिळविली होती. पहिल्यांदाच निवडणुकीत त्यांना राणेंविरोधात मिळालेली ही मते पाहून उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढे काम करत राहण्याचे आदेशही दिले होते. मात्र, त्यानंतर वैभव नाईक यांनी याच मतदार संघात ठाण मांडून बसताना विविध उपक्रम राबविले.
जिल्ह्यात काँग्रेसविरोधी असलेले वातावरण, नारायण राणे यांच्याविरोधी असलेले वातावरण तसेच राणे समर्थकांनी विविध कामांमधून ओढवून घेतलेली लोकांची नाराजी अशा अनेक मुद्दांचा अभ्यास करून वैभव नाईक यांनी आपल्या कामाचा झंझावात सुरूच ठेवला होता. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी पराभव होवूनही वैभव नाईक यांनी २0१४ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामकाज सुरू ठेवले होते.
त्यानंतर जिल्ह्यात शासनाच्या विरोधात अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेत कार्यकर्त्यांना एकत्रित करून शिवसेना वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. तसेच अलिकडच्या चार वर्षांच्या कालावधीत कुडाळ आणि मालवण या दोन्ही तालुक्यांमध्ये कोणतीही आपत्ती असो अथवा कार्यक्रम असो ते सर्वप्रथम पोहचत होते. त्यामुळे जनमानसात त्यांनी आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली. त्यातच काँग्रेसविरोधी वातावरणाचा फायदा त्यांना झाला.
त्यातच लोकसभा निवडणुकीत माजी खासदार नीलेश राणे यांचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून दारूण पराभव झाला. त्यात कुडाळ-मालवण या मतदार संघाने २१ हजारांचे मताधिक्य खासदार विनायक राऊत यांना दिले होते. त्यामुळे विनायक राऊत यांच्या विजयाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खूपच प्रेरीत झाली होते. राऊत यांच्या विजयानंतर त्यांनी त्वरीत रत्नागिरीत येत त्यांचे अभिनंदन केले होते. तर त्यानंतर मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीला बोललेला नवस फेडण्यासाठी सर्व खासदारांना घेवूनही उद्धव ठाकरे मालवणात आले होते. त्यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्या पराभवासाठी भराडी आईकडे मागणेदेखील मागितले होते. नारायण राणे यांचे सुपूत्र नीलेश राणे यांच्या पराभवानंतर नारायण राणे यांचा पराभव करण्याची एकच महत्वाकांक्षा उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविली होती. वैभव नाईक यांनी रविवारी १0 हजारांच्या मताधिक्याने नारायण राणेंसारख्या मातब्बर नेत्याचा पराभव करत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेताना उद्धव ठाकरे यांचे स्वप्नदेखील पूर्ण केले.
दुसरीकडे सावंतवाडी मतदार संघात दीपक केसरकर यांनी शिवसेनेला मोठे यश मिळवून दिले आहे. राष्ट्रवादीकडे असलेली त्यांची सर्वच्या सर्व वोट बँक त्यांनी आता शिवसेनेकडे वळविली आहे.
त्यामुळे एकेकाळी केवळ काही हजारांमध्ये असलेली शिवसेनेची मते या विधानसभा निवडणुकीत आता दीड लाखांच्या घरात गेली आहे. यावेळी तर भाजपा आणि राष्ट्रवादी तसेच नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांचा दुसरा गट शिवसेनेसोबत नव्हता. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला मिळालेली मते ही त्यांची स्वत:ची वोट बँक बनली आहे. आता दोन वर्षांच्या कालावधीत दुसरी कोणती मोठी निवडणूक नसेल. त्यामुळे राजकारणाबाबतचा सर्व धुरळा शांत होईल. मात्र, असे असले तरी शिवसेनेने वैभव नाईक आणि दीपक केसरकर यांच्या रूपाने मिळविलेले यश वाखाणण्याजोगे आहे.
राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता येईल अथवा दुसऱ्या कोणाचीही येईल मात्र, सिंधुुदुर्गात आता नारायण राणेंचे वादळ शमविण्यात या घडीला तरी शिवसेनेला यश मिळाले आहे.
(क्रमश:)
काँग्रेस पाठोपाठ द्वितीय क्रमांकाची मते
जिल्ह्यात तीनपैकी दोन मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले असले तरी जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघातील पक्षाला मिळालेली एकूण मते पाहता काँग्रेसच नंबर वनचा पक्ष बनला आहे. जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तिन्ही मतदार संघात एकूण १६०२९७ मते मिळाली. सर्वाधिक मते कणकवली मतदारसंघात पडली आहेत. तर काँग्रेस पाठोपाठ शिवसेनेला जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात एकूण १५४३४७ मते मिळाली. सर्वाधिक मते सावंतवाडी मतदारसंघात पडली. त्यामुळे काँग्रेस पाठोपाठ शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अनुक्रमे तीन आणि चार क्रमांकावर फेकले गेले आहेत.
सिंधुदुर्ग
वार्तापत्र