vकुडाळ तालुका राष्ट्रवादीच्यावतीने वनअधिकाऱ्यांना घेराओ घालणार
By Admin | Updated: November 23, 2014 23:57 IST2014-11-23T22:38:12+5:302014-11-23T23:57:57+5:30
निवेदनातून इशारा : हत्ती हल्ल्यातील जखमीला तातडीने मदत द्या

vकुडाळ तालुका राष्ट्रवादीच्यावतीने वनअधिकाऱ्यांना घेराओ घालणार
कुडाळ : वेताळबांबर्डे-गडकरवाडी येथील हत्तींच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वैभव गायकवाड या युवकाला दोन दिवसात वनविभागाने आर्थिक मदत न दिल्यास कुडाळ तालुका राष्ट्रवादीच्यावतीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराओ घालण्यात येईल, असा इशारा कुडाळ तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर यांनी वनविभागाला दिला.
वेताळबांबर्डे-गडकरीवाडी येथील वैभव गायकवाड या युवकावर रविवारी रानटी हत्तींनी हल्ला करून गंभीर जखमी केले होते. वैभवला वनविभागाकडून आतापर्यंत फक्त पाच हजार रुपयांचीच मदत देण्यात आली असून या घटनेला चार ते पाच दिवस झाले तरी पूर्णपणे मदत दिली गेलेली नाही.
यामुळे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर, प्रदेश सरचिटणीस अमित सामंत, उपसभापती आर. के. सावंत, भास्कर परब, जिल्हा परिषद सदस्या रेवती राणे, पूनम सावंत, संग्राम सावंत, साबा पाटकर, कृष्णा बिबवणेकर, महादेव राऊळ, उत्तम सराफदार, अशोक पालव, संदीप राणे, शिवाजी घोगळे, धीरज पांचाळ, सूर्यकांत नाईक या राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कुडाळ वनविभागाचे वनक्षेत्रपाल संजय कदम यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली.
यावेळी या हत्तींच्या कायमस्वरुपी बंदोबस्तासाठी कोणत्या उपाययोजना करणार, असा प्रश्न वनक्षेत्रपाल यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला. यावर उत्तर देताना वनक्षेत्रपाल म्हणाले की, कर्नाटकातून हत्ती प्रशिक्षक मागविण्यात येणार असून हत्तींना पकडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येईल. हत्ती प्रशिक्षित करण्यासाठी आंब्रड येथे जागा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच या मोहिमेसाठी जिल्हाधिकारी यांना प्राथमिक स्वरुपात १४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.
जखमी वैभवच्या औषधोपचाराचा सर्व खर्च वनविभागाने उचलावा, अशी मागणी यावेळी सर्वांनी केली. (प्रतिनिधी)