३,८४१ जणांकडून नोटाचा वापर
By Admin | Updated: October 21, 2014 23:38 IST2014-10-21T21:43:40+5:302014-10-21T23:38:54+5:30
विधानसभा निवडणूक : सर्वाधिक सावंतवाडी मतदारसंघात

३,८४१ जणांकडून नोटाचा वापर
गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी -विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती आणि आघाडी तुटल्याने मतदारांना यंदा उमेदवारांचे एकापेक्षा अनेक पर्याय उपलब्ध होते. तरीदेखील यापैकी कोणताही उमेदवार आमच्या दृष्टीस पात्र नसल्याचा निष्कर्ष काढून जिल्ह्यातील तब्बल ३ हजार ८४१ मतदारांनी ‘नन आॅफ द अबोव्ह’चा (नोटा) अधिकार वापरला आहे. नोटाचे मतदान होणारी विधानसभेची ही पहिलीच निवडणूक आहे. या अगोदर गेल्या लोकसभेला ‘नोटा’ हा पर्याय होता.
१९ आॅक्टोबरला नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेतील मतमोजणीच्या निकालानंतर नोटाचा सर्वाधिक वापर हा सावंतवाडी मतदारसंघात तर दुसऱ्या स्थानावर कणकवली मतदारसंघात नोटाचा वापर करण्यात आला आहे तर तिसऱ्या स्थानावर कुडाळ विधानसभेचा क्रमांक लागतो.
निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार मान्य नसेल तर अनेक मतदार गेल्यावर्षापर्यंत मतदान न करण्याचा पर्याय निवडत होते. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच मतदानाच्या यंत्रावर ‘नोटा’च्या स्वतंत्र बटणाचा समावेश झाला. नोटा पर्याय असलेली लोकसभा ही पहिलीच निवडणूक ठरली होती. त्यानंतर आता विधानसभेत या ‘नोटा’ पर्यायाचा वापर करण्यात आला होता.
कणकवली विधानसभा मतदारसंघात कणकवली, देवगड व वैभववाडी हे तालुके येत असून त्यामध्ये १ लाख ५५ हजार ५३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यातील १३८१ मतदारांनी नोटा हा पर्याय निवडला. कुडाळ विधानसभा मतदारसंघात कुडाळ व मालवण हे दोन तालुके येतात. यामध्ये १ लाख ४० हजार ४५८ मतदारांनी मतदान केले होते. त्यातील ९४९ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली. तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग हे तीन तालुके येतात.
या तीन तालुक्यातून १ लाख ४५ हजार ३४८ मतदारांनी मतदान केले होते. त्यातील १५११ मतदारांनी नोटा पर्याय निवडला. असे जिल्ह्यात एकूण ४ लाख ४१ हजार ३४४ एवढे मतदान झाले होते. त्यातील तब्बल ३ हजार ८४१ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती व आघाडी संपुष्टात आल्याने उमेदवारांची संख्या कमालीची वाढली होती. वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र कुणालाच मत न देता गप्प राहण्यापेक्षा ‘नोटा’ बटण दाबणेच मतदारांनी पसंत केले. त्यामुळे जिल्ह्यात ३ हजार ८४१ मतदारांनी ‘नोटा’चे बटण दाबले.
मतदारांकडून नोटाचा वापर...
मतदारसंघएकूण मतदान नोटा मते
कणकवली१,५५,५३८१३८१
कुडाळ१,४०,४५८९४९
सावंतवाडी१,४५,३४८१५११
एकूण४,४१,३४४३८४१