गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजननासाठी इंजेक्शनचा वापरमत्स्योत्पादन वाढणार :
By Admin | Updated: July 25, 2014 22:50 IST2014-07-25T22:27:01+5:302014-07-25T22:50:59+5:30
सद्य स्थितीत गरजेचा प्रयोग

गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजननासाठी इंजेक्शनचा वापरमत्स्योत्पादन वाढणार :
रत्नागिरी : गोड्या पाण्यातील माशांना प्रजननासाठी प्रेरित करण्याकरिता चक्क इंजेक्शनचा वापर केला जात आहे. माशांचे बिजोत्पादन व मत्स्योत्पादन वाढविण्यासाठी इंजेक्शनचा वापर करण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला १५७ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. मासेमारी प्रामुख्याने समुद्रात होत असली तरी नदीपात्रातील गोड्या पाण्यात मासेमारी केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यात त्याचे अल्प आहे. जुलैमध्ये पाऊस झाल्याने नदीपात्र भरली आहेत. नदीपात्रातही अॅक्वेलिंग प्रक्रिया होते. मासे पावसाचे तुषार झेलण्यासाठी उथळ पात्रात येतात. नदीपात्रात मासे अंडी घालतात. जून ते आॅगस्ट हा माशांच्या प्रजननाचा काळ ओळखला जातो. मात्र, सध्या नद्यांची परिस्थितीही विदारक दिसून येत आहे. काही नद्यांच्या ठिकाणी मगरींचा वावर आहे, तर काही नद्यांमध्ये रेती उत्खनन सुरू असल्याचा प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम बिजोत्पादन व मत्स्योत्पादनावर होत आहे. प्रा. डॉ. हिरालाल चौधरी व डॉ. के. एच. अलिकुन्ही यांनी ओरिसा येथे १० जुलै १९५७ साली कटक माशाला इंजेक्शन देऊन प्रजननासाठी प्रेरित केले. संबंधित प्रयोग यशस्वी झाल्यानंतर १० जुलै ‘राष्ट्रीय मत्स्यदिन’ साजरा करण्यात येऊ लागला. मात्र, डॉ. चौधरी व डॉ. अलिकुन्ही यांचा प्रयोग सध्याच्या स्थितीत गरजेचा बनला आहे. नदीपात्रातील रोहू, कटला, रिगल या माशांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे घटणारे मत्स्योत्पादन वाढविण्यासाठी बिजोत्पादन वाढविणे गरजचेचे आहे. रायगड येथे ३ खासगी व ठाणे तलासरी येथे शासकीय एक बिजोत्पादन केंद्र मिळून चार केंद्र आहेत. प्रजननासाठी प्रेरित करणाऱ्या नर व मादी तत्सम् जातीच्या माशांना एका टँकमध्ये सोडले जाते. त्याठिकाणी कृत्रिम तुषार निर्माण करून पावसाळी वातावरण तयार केले जाते. नंतर ‘ओव्हा प्रिम’सारखे इंजेक्शन नर व मादीला देऊन प्रजननासाठी प्रेरित केले जाते. जेणेकरून घटणारे मत्स्योत्पादन, बिजोत्पादन टिकविण्यास मदत होते.
बहुतांश नद्या गाळाने भरल्या आहेत. काही नदीपात्र तर संपुष्टात आली आहेत. बहुतांश नद्यांमध्ये मगरींचा वावर दिसून येतो. एकूणच प्रतिकूल परिस्थितीत मत्स्योत्पादन व त्याचे बिजोत्पादन टिकविण्यासाठी इंजेक्शनचा वापर सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बिजोत्पादन केंद्र नसल्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा अभ्यासवजा प्रयोग दाखविण्यासाठी जिल्ह्याबाहेर नेले जात आहे. (प्रतिनिधी)
घटलेले मत्स्योत्पादन वाढविणे किंवा त्यांचे बीज वाढविणे काळाची गरज आहे. त्यामुळे शास्त्रीयदृष्ट्या पूर्ण अभ्यास करून इंजेक्शन प्रक्रियेचा अवलंब केला जात आहे. वास्तविक ही पध्दत जुनी व सर्वदृढ आहे. त्यामुळे बीजोत्पादन केंद्रात बीजनिर्मितीसाठी त्याचा वापर केला जात आहे.
- प्रा. विजय जोशी,
डीन, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी
-बिजोत्पादनासाठी नवा पर्याय
-गोड्या पाण्यातील मासेमारी वाढण्यासाठी नवा उपाय
-रोजगाराची मोठी संधी मिळणार
-पावसाळी हंगामात मोठा व्यवसाय उभा करता येणे शक्य
-रेती उत्खननाचा बिजोत्पादनावर होणाऱ्या दुष्परिणामांवरही पर्याय
-रत्नागिरीत बिजोत्पादन केंद्र नाही, विद्यार्थी प्रशिक्षण बाहेरच