अवकाळी पावसाने कोट्यवधीची हानी पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू : वीजपुरवठा खंडित
By Admin | Updated: May 9, 2014 00:17 IST2014-05-09T00:17:45+5:302014-05-09T00:17:45+5:30
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची त्रेधा उडविली. वेंगुर्ले वगळता इतर सर्व तालुक्यांत वादळी

अवकाळी पावसाने कोट्यवधीची हानी पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू : वीजपुरवठा खंडित
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची त्रेधा उडविली. वेंगुर्ले वगळता इतर सर्व तालुक्यांत वादळी वार्यासह जोरदार पाऊस पडला. कणकवली तालुक्यात सर्वाधिक ५१ मि. मी. तर त्या पाठोपाठ सावंतवाडी तालुक्यात ३५ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली असून, या पावसामुळे जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात पोहोचला आहे. पंचनामे सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कोकणात मान्सून सुरू होण्यास अद्याप एक महिना बाकी असतानाच बुधवारी जिल्ह्यात वेंगुर्ला वगळता वादळी वार्यासह जोरदार पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसाने जिल्हावासीयांची त्रेधातिरपीट उडविली. सोसाट्याच्या झालेल्या वार्यात कित्येक जणांच्या घरांवरील सिमेंटचे पत्रे उडून गेले. शेकडो झाडे उन्मळून पडून वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच काही झाडे घरांवर, गुरांच्या गोठ्यांवर पडून लाखो रुपयांची हानी झाली आहे. कणकवली, सावंतवाडी व वैभववाडी तालुक्यात जोरदार वादळी पाऊस झाल्याने वीजवाहक तारांवर झाडे पडून तसेच विद्युत खांब उन्मळून पडल्याने काही ठिकाणचा विद्युतपुरवठा खंडित झाला होता. या सर्व घटनेचा अद्याप नुकसानीबाबत रितसर पंचनामा झाला नसून, त्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे अद्याप नुकसानीची निश्चित आकडेवारी आपत्ती कक्षाकडे उपलब्ध नाही. (प्रतिनिधी)