जिल्ह्यात अघोषित भारनियमन सुरू
By Admin | Updated: July 14, 2015 23:56 IST2015-07-14T23:56:27+5:302015-07-14T23:56:27+5:30
मागणी वाढली : लांबलेल्या पावसाचा फटका

जिल्ह्यात अघोषित भारनियमन सुरू
मालवण : राज्यात पाऊस लांबल्याने अघोषित भारनियमन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सोमवारपासून ही कार्यवाही सुरू झाली असून, वाढलेल्या उष्म्या बरोबरच इमर्जन्सी भारनियमनाचे चटके सहन करावे लागत आहेत. गेल्या १५ दिवसांत विजेच्या मागणीत सुमारे तीन ते ३.५ हजार मेगावॅटने वाढ झाली आहे. वाढलेली विजेची मागणी व पुरवठ्याची सांगड घालण्यात अडचणी येत असल्यामुळे संपूर्ण राज्यात अघोषित भारनियमन जारी करण्यात आले आहे, अशी माहिती वीज वितरणकडून देण्यात आली.
सिंधुदुर्गात सकाळी ८ ते १० आणि दुपारी २ ते ४ या वेळेत इमर्जन्सी भारनियमन करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे कृषिपंपाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे १५ दिवसांपूर्वी राज्यात असलेली १३,५०० ते १४,००० मेगावॅट विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे वीज मागणी व वीजपुरवठा यांचा मेळ घालण्यासाठी अघोषित भारनियमन लागू करण्यात आल्याने ग्राहकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. (वार्ताहर)
पावसाची प्रतीक्षा
मागील आठवड्यापासून पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. भरडावरील भातशेती करण्यासाठी सध्या शेतकऱ्यांना शेतीपंपाचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा लागत आहे. सध्या पडत असलेल्या कडक उन्हामुळे भातशेती करपून जाण्याची भीती व्यक्त होत आहे.